Suresh Pujari Extortion Case: गँगस्टर सुरेश पुजारीवर 50 लाखांच्या खंडणीचा गुन्हा दाखल
पुजारीला स्थानिक गुप्तचर सेवांनी 15 ऑक्टोबर रोजी फिलीपिन्समध्ये अटक केली. तेव्हाच तक्रारदाराने या प्रकरणाची तक्रार करण्याचे धाडस दाखवले, अधिकारी म्हणाला.
सांताक्रूझ (Santa Cruz) येथील एका रेस्टॉरंटकडून 50 लाख रुपयांची खंडणी (Extortion) घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) बुधवारी गुंड सुरेश पुजारी (Suresh Pujari) याच्याविरुद्ध नवीन खंडणीचा गुन्हा दाखल केला. ऑक्टोबर 2021 मध्ये फिलिपाइन्समध्ये (Philippines) अटक करण्यात आलेल्या पुजारीविरुद्धचा हा ताजा खटला गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. उत्तर-पश्चिम मुंबईतील ओशिवरा येथील रहिवासी असलेल्या 51 वर्षीय तक्रारदाराचे सांताक्रूझ येथे रेस्टॉरंट आणि बार आहे. फिर्यादीने पोलिसांना सांगितले की, त्याच्या एका साथीदाराला या वर्षी मार्चमध्ये पुजारीकडून खंडणीच्या धमक्या आल्या होत्या. 50 लाख रुपये न दिल्यास गुंडाने रेस्टॉरेंट मालकाला जीवे मारण्याची धमकी दिली होती.
एका पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, आपल्या जीवाच्या भीतीने तक्रारदाराने कोणालाच काही सांगितले नाही. पुजारीला स्थानिक गुप्तचर सेवांनी 15 ऑक्टोबर रोजी फिलीपिन्समध्ये अटक केली. तेव्हाच तक्रारदाराने या प्रकरणाची तक्रार करण्याचे धाडस दाखवले, अधिकारी म्हणाला. मंगळवारी सांताक्रूझ पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 387 कोणत्याही व्यक्तीला मृत्यूची भीती दाखवून किंवा गंभीर दुखापत करून खंडणी उकळणे आणि 504 हेतूपूर्वक अपमान या कलमांनुसार तक्रार दाखल करण्यात आली. हेही वाचा BMC Restoration Work: बृहन्मुंबई महानगरपालिका करणार फोर्टमधील मुख्यालयाच्या इमारतीची दुरूस्ती
हे प्रकरण तपासासाठी गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी कक्षाकडे वर्ग करण्यात आले आहे. पुजारीवर यापूर्वीच मुंबईत खंडणीचे सात गुन्हे दाखल आहेत. तसेच ठाणे आणि नवी मुंबईत खंडणी व गोळीबाराचे अनेक गुन्हे दाखल आहेत, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तो 14 वर्षांपासून फरार होता. 2015 मध्ये इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. त्याच्या गुन्हेगारी कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात पुजारी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन आणि नंतर रवी पुजारी टोळीशी निगडीत होता.
परंतु 2011 मध्ये तो स्वतःहून बाहेर पडला. सुरेश पुजारी आणि रवी पुजारी दोघेही संपर्कात राहिले आणि एकमेकांना मदत करत होते, असे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, पुजारी वारंवार सुरेश पुरी आणि सतीश पै अशी उपनावे वापरत असे. 2013 मध्ये तो मुंबईला परतला, पण बनावट पासपोर्टवर तीन दिवसांत देश सोडून गेला.