Ganeshotsav 2022: पुण्यात संगम तरुण मंडळाच्या 'अफजल खान वधा'च्या दिखाव्याला पोलिसांनी नाकारली परवानगी

ऐतिहासिक देखावे साकारण्यासाठी संगम तरुण मंडळ प्रसिद्ध आहे.

Pune Police | (Photo Credits: ANI)

गणेश चतुर्थीचा (Ganesh Chaturthi) सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदा दोन वर्षांच्या निर्बंधांनंतर मोकळ्या वातावरणामध्ये आणि पूर्वीप्रमाणे जल्लोषात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यासाठी मंडळांची लगबग सुरू झाली आहे. पुण्यामध्ये अफझल खान वधाचा जिवंत देखावा साकारण्यासाठी मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. यामुळे पुण्यात वाद पेटण्याची शक्यता आहे. कोथरूड (Kothrud) परिसरातील संगम तरुण मंडळाने (Sangam tarun Mandal) देखाव्यासाठी परवानगी मागितली होती पण पोलिसांनी ती नाकारली आहे.

पुणे पोलिसांनी कायदा व सुवस्थेचं कारण सांगत यासाठी परवानगी नाकारली आहे. त्यानंतर मनसेचे नेते किशोर शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे. आपल्याकडे शिवाजी महाराजांचा जीवनपट दाखवण्याची भीती वाटत असेल तर मग काय पाकिस्तानात जाऊन दाखवायचा का? हेच का हिंदूत्ववादी सरकार? असा सवाल किशोर शिंदे यांनी विचारला आहे. आम्ही या विरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा विचार करत आहोत. मात्र त्यापूर्वी हिंदुत्वाच्या नावावर सरकार बनवलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे की, ते आम्हाला परवानगी देतील, असं किशोर शिंदे यांनी म्हटलं आहे.

संगम तरुण मंडळ मागील 56 वर्ष सार्वजनिक गणेशोत्सव साजरे करत आहे. ऐतिहासिक देखावे साकारण्यासाठी संगम तरुण मंडळ प्रसिद्ध आहे.

मुंबईमध्येही काल नागपाडा भागात गणपती मिरवणूकी दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मूर्तीची विटंबना करण्याचा प्रयत्न झाला. संबंधीत व्यक्तीला अटक करुन आरोपीवर कलम 295A आणि 153A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणीही पोलिस तपास सुरू आहे.