Hiware Bazar Forest Fire: आदर्श गाव हिवरेबाजार हद्दीतील जंगलाला आग, पोपटराव पवार यांनी सांगितले कारण

हिवरेबजार हे आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखले जाणारे गाव आहे. या गावातील वनसंपत्तीमुळे हे गाव मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले. आजही हे गाव पाहण्यासाठी विक्रमी संख्येने लोक राज्य आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून येतात.

Forest Fire | Images for symbolic purposes only । (Photo Credits: Pixabay)

आदर्श गाव अशी ओळख असलेल्या हिवरेबाजार (Hiware Bazar) येथे जंगलाला आग (Forest Fire) लागली आहे. हिवरेबजार हे आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखले जाणारे गाव आहे. या गावातील वनसंपत्तीमुळे हे गाव मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले. आजही हे गाव पाहण्यासाठी विक्रमी संख्येने लोक राज्य आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून येतात. दरम्यान, या गावातील जंगलाला मोठी आग लागली परंतू नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे ही आग आटोक्यात आणण्यास यश मिळाले.

गुरुवारी सकाळी (31 मार्च) हिवरेबजार गावच्या परिसरातील जंगला आग भडकली. आग भडकल्याचे वृत्त वाऱ्यासारखे गावात पसरले. हिवरेबजार गावची वनसंपत्ती गावकऱ्यांनी अत्यंत कष्टाने निर्माण केली आहे. त्यामुळे आग भडकल्याचे समजताच गावकऱ्यांना एकच धक्का बसला. गावकऱ्यांनी आग लागलेल्या ठिकाणी तातडीने धाव घेतली. आग आटोक्यात आणण्यास प्राधान्य दिले. वाढत्या उष्णतेमुळे ही आग भडकल्याची प्राथमिक माहिती आहे. सकाळी भडकलेली ही आग दुपारपर्यंत गावातील गिरीमहाराज मंदिर परिसरातील जंगलापर्यंत आली. (हेही वाचा, Telangana: लाकडी गोदामाला आग, 11 जणांचा होरपळून मृत्यू; हैदराबाद येथील घटना)

गावकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करुन ही आग आटोक्यात आणली. अचानक लागलेल्या आगीमुळे जंगलातील वन्य प्राणी व पक्षी जसे की, मोर, हरणे, ससे, रानडुकरे, लांडगे व इतर वन्यजीव जीवाच्या आकांताने इकडेतिकडे धावत आणि आकासात उडत होते. या गावचे मार्गदर्शक पोपटराव पवार यांनी आगीविषयी माहिती देताना सांगितले की, आग लागण्याची घटना नवी नाही. पाठीमागील काही वर्षांपासून मार्च, एप्रिल महिन्यात या परिसरात नेहमीच छोट्यामठ्या आगी लागतात. मात्र, नागरिक सतर्क असतात. त्यामुळे फारसे नुकासन घडत नाही.

शेतातील सुगी संपली की, मशागतीपुर्वी शेतकरी परिसरातील बांध पेटवून देतात. त्यामुळे गवताने पेट घेतला की आग भडकते. या वेळीही एका शेतकऱ्याने बांधावरचे गवत पेटवले त्यातून ही आग भडकली, असेही पोपटराव पवार म्हणाले.