Food Trucks in Mumbai: खाद्य व्यवसाय सुरु करण्याची सुवर्णसंधी; BMC शहरातील 50 ठिकाणी सुरु करणार फूड ट्रक, लवकरच निविदा काढणार
चालकांसाठी, मुंबई अग्निशमन दल, बीएमसीचे आरोग्य विभाग आणि दुकान आणि आस्थापना विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्रे तसेच राज्य परिवहन महामंडळाची मान्यता आवश्यक असेल
मुंबईमध्ये (Mumbai) महापालिका निवडणुकीच्या अगोदर, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने विधी समितीकडे सर्वसमावेशक फूड ट्रक धोरण (Food Truck Policy) मंजुरीसाठी सादर केले आहे. यामध्ये संपूर्ण शहरात 50 ठिकाणी खाद्य ट्रक उभारण्यासाठी वितरण आणि प्लेसमेंटचा समावेश आहे. धोरणानुसार, 'फूड ऑन व्हील्स' च्या धर्तीवर नियोजित फूड ट्रकसाठी स्लॉटची निविदा काढली जाईल. फूड ट्रक्सना फक्त एकाच ठिकाणाहून चालवण्याची परवानगी असेल. संपूर्ण शहरात त्यांना प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. पॉलिसी मंजूर झाल्यानंतर, बीएमसी याबाबत निविदा जारी करेल.
त्यानंतर फूड ट्रक चालवण्यासाठी बोलीदारांची निवड केली जाईल. एकूण स्थानांपैकी जवळपास 25 किंवा 50% जागा महिला बचत गटांना दिल्या जाणार आहेत. या फूड ट्रकच्या जागा 36 महिन्यांच्या कालावधीसाठी करारावर दिल्या जातील. योजनेनुसार, फूड ट्रक स्पॉट शहरातील उद्याने/बाग, पर्यटन स्थळे, शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांजवळील असतील. या ट्रक्सच्या जागा सध्याच्या रेस्टॉरंटपासून किमान 200 फूट अंतरावर असाव्यात आणि दोन ट्रकमध्ये किमान 15 फूट अंतर असावे, असे सांगण्यात आले आहे.
जागा निश्चित झाल्यानंतर 15 दिवसांपर्यंत नागरिक त्यावर शिफारशी आणि हरकती दाखल करू शकतात. फुट ट्रकबाबत नागरी अधिकार्यांनी हमी दिली पाहिजे की फूड ट्रकच्या ठिकाणांजवळ राहणाऱ्या रहिवाशांचा या युनिटवर आक्षेप नाही. या धोरणात 'फूड ऑन व्हील्स'द्वारे संतुलित आणि पौष्टिक खाद्यपदार्थ विकण्याच्या गरजेवर भर देण्यात आला आहे. ट्रक मालक ट्रकच्या आत, एलपीजी, मायक्रोवेव्ह आणि इलेक्ट्रिक कुकिंग युनिट्स वापरू शकतात.
चालकांसाठी, मुंबई अग्निशमन दल, बीएमसीचे आरोग्य विभाग आणि दुकान आणि आस्थापना विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्रे तसेच राज्य परिवहन महामंडळाची मान्यता आवश्यक असेल. दरम्यान, याआधी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मुंबईतील पहिले 'फूड ऑन व्हील्स' रेस्टॉरंट सुरु केले आहे. (हेही वाचा: Marathi Board on Shops: दुकानांवर मराठी पाट्यां लावण्यास विरोध, विरेन शाह यांना न्यायालयाकडून 25 हजारांचा दंड)
याच्या यशामुळे भारतीय रेल्वेने कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनस येथेही असेच रेस्टॉरंट सुरू करण्याची योजना आखली असून त्याला बोगी वोगी असे नाव दिले आहे. कल्याण स्टेशन, लोणावळा, नेरळ, चिंचवड, मिरज, इगतपुरी यासह इतर ठिकाणी अशी आणखी रेस्टॉरंट्स उभारण्याची योजना आहे.