मुंबई: Coronavirus बरा करणारे प्रॉडक्ट विकणाऱ्या व्यक्तीच्या दुकानावर FDA ची धाड; पोलिसांकडून अटक
या व्यक्तीच्या दुकानावर एफडीए आणि मुंबई पोलिसांकडून धाड टाकण्यात आली आहे. ही व्यक्ती दुकानातील एक प्रॉडक्ट कोरोना व्हायरस पूर्णपणे बरा करत असल्याचा दावा करत होता.
देशासह राज्यातही धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसची (Coronavirus) दहशत दिवसेंदिवस वाढतच आहे. सातत्याने रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ पाहता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यातच लोकांच्या भीतीचा गैरफायदा घेणाऱ्या एका व्यक्तीला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीच्या दुकानावर एफडीए (Food and Drugs Administration) आणि मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) धाड टाकण्यात आली आहे. ही व्यक्ती दुकानातील एक प्रॉडक्ट कोरोना व्हायरस पूर्णपणे बरा करत असल्याचा दावा करत होती.
कोरोना व्हायरसने आपले प्रस्थ वाढवायला सुरुवात केल्यानंतर अनेक गैरप्रकार समोर येऊ लागले. बनावट सॅनिटायझर्स, मास्कची विक्री करणारे अनेक प्रकार उघडकीस आले. यातच लोकांच्या भीतीचा फायदा घेणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. यापूर्वी उत्तर प्रदेशातून कोरोना बाबा याला अटक करण्यात आली होती. 11 रुपयांचे ताईत देवून कोरोना व्हायरस बरा करणार असल्याचा दावा तो करत असे. (कोरोना बाबा गजाआड, 11 रुपयांचा ताईत देऊन Coronavirus बरा करत असल्याचा करायचा दावा)
ANI Tweet:
महाराष्ट्रात कोरोनाचे एकूण 39 रुग्ण असून पिंपरी-चिंचवड 9, पुणे 7, मुंबई 6, नागपूर 4, यवतमाळ, नवी मुंबई, कल्याण येथे प्रत्येकी 3, रायगड, ठाणे, अहमदनगर, औरंगाबाद प्रत्येकी 1 रुग्ण असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तर मुंबईत एका व्यक्तीने आपले प्राण गमावले आहेत. कोरोना व्हायसरचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे. मात्र अशाप्रकारेच गैरप्रकार वाढत असल्याने सरकारपुढील आव्हान अधिकच वाढत आहे.