Flood in Maharashtra: अतिवृष्टी मुळे नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या पाठीशी राज्य सरकारसोबत केंद्रानेही उभं रहावं; महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची केंद्र सरकारकडे भरीव मदतीची मागणी
त्यामुळे राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारसोबत केंद्रानेही भरीव मदत करत शेतकर्यांच्या पाठीशी उभे रहावे अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्राला परतीच्या पावसाने झोडपून काढलं आहे. शेतीच्या नुकसानी सोबतच पुण्यामध्ये 4 जिल्ह्यांत 28 जण वाहून गेले आहेत. तर एक बेपत्ता आहे. सध्या निम्मा महाराष्ट्र ओल्या दुष्काळाच्या सावटाखाली आहे. आधीच कोरोना संकटामुळे खचलेल्या महाराष्ट्राला आता अतिवृष्टीने फटका बसला आहे. त्यामुळे राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Minister of Revenue Balasaheb Thorat) यांनी राज्य सरकारसोबत केंद्रानेही भरीव मदत करत शेतकर्यांच्या पाठीशी उभे रहावे अशी मागणी केली आहे. दरम्यान काल केंद्रातील भाजप सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात कॉंग्रेसने शेतकरी बचाओ रॅलीचे देखील आयोजन केले होते. Maharashtra Rains Update: महाराष्ट्रात मुसळधार पाऊस; पाहा पाच महत्त्वाच्या बातम्या.
महाराष्ट्र दरवर्षी सुक्या दुष्काळाने चिंतेत असतो. यंदा राज्यात चांगला पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला होता. हाता-तोंडाशी आलेले, शेतामध्ये तरारलेलं पीक पाहून अनेकांनी आनंद व्यक्त केला होता पण मागील 2-4 दिवसांत कोसळलेल्या धुव्वाधार पावसाने सारे गणित विस्कटून टाकले आहे. यावर्षीच्या मान्सूनने आधी विदर्भात पूरस्थिती निर्माण केली होती तर आता परतीच्या पावसाचाही मोठा फटका सोलापूर, उस्मानाबाद, पुणे, सांगलीसह राज्याच्या इतर भागालाही बसला आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील उभी पिकंही वाया गेली आहेत. या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी राज्य सरकार शेतकऱ्यांचा पाठीशी खंबीरपणे उभे असून नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. राज्य सरकार केंद्र सरकारकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवेल पण केंद्र सरकारनेही त्यासाठी भरीव आर्थिक मदत द्यावी , अशी मागणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
केंद्र सरकारने राज्याला भरीव मदत देण्याची आवश्यकता आहे. आतापर्यंतचा अनुभव पाहता केंद्राकडून तुटपुंजी मदतच केली गेली आहे. आता तर राज्य सरकारसमोर कोरोना संकटामुळे मोठ्या आर्थिक अडचणी आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करुन राज्याला जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी प्रयत्न करतील असेही थोरात म्हणाले.
बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. त्याचा फटका महाराष्ट्राला बसला आहे. दरम्यान आता त्याचा प्रभाव कमी झाला असून पावसाचा जोर महाराष्ट्रात ओसरला आहे.