Barshi Fire: बार्शीत फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; दोन कामगारांचा मृत्यू, अनेक जण जखमी

स्थानिकांच्या माहितीनुसार या स्फोटात 6 ते 7 कर्मचारी जखमी झाले असून दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे.

Fire | Images for symbolic purposes only । (Photo Credits: Pixabay)

Barshi Fire: राज्यात नववर्षातील पहिल्याचं दिवशी दोन ठिकाणी आग (Fire) लागल्याच्या घटना घडल्या आहेत. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील बार्शी (Barshi) तालुक्यातील पांगरीमध्ये फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट झाला. यात अनेक कामगार जखमी झाले असून दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळ ही घटना घडली आहे. फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असताना हा भीषण स्फोट झाला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेमध्ये दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. परंतु, अद्याप याला प्रशासनाकडून कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही.

प्राप्त माहितीनुसार, या फटाका फॅक्टरीमध्ये सुमारे 40 कामगार काम करत होते. स्थानिकांच्या माहितीनुसार या स्फोटात 6 ते 7 कर्मचारी जखमी झाले असून दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. (हेही वाचा - Fire Breaks Out at Jindal Company Nashik: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत- केंद्रीय मंत्री भारती पवार)

हा स्फोट इतका भीषण होता की, यामुळे आजूबाजूचा परिसर दणाणून गेला. तसेच परिसरात धुराचे आणि आगीचे लोट दिसून आले. स्थानिक ग्रामस्थांनी आणि अग्निशमन दलाने आग नियंत्रित केली असून फॅक्टरीमधील सर्व कर्मचाऱ्यांना उपचारासाठी बार्शी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, आज नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील जिंदाल पॉलिफिल्म्स या कंपनीला भीषण आग लागली. स्फोटाच्या घटनेत अनेक कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नववर्षाच्या सुरुवातीलाचं राज्यात दोन ठिकाणी आगीच्या घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.