स्वत:च्या हाताने चिता रचून शेतकरी महिलेची आत्महत्या; बुलडाणा येथील खळबळजनक घटना

तसेच, त्यांना इतरही खासगी सावकारांचे देणे होते. यंदाच्या वर्षी त्यांनी सोयाबीनचे पिक घेतले होते. पण, सोयाबीन पिकाने दगा दिल्याने उत्पन्न कमी झाले होते

महिला शेतकऱ्याची स्वत:च्या हाताने चिता रचून आत्महत्या (file image)

Drought In Maharashtra: स्वत:च्या हातानेच चिता रचून त्यावर स्वत:ला पेटवून घेत एका शेतकरी महिलेने आत्महत्या केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात धोत्राभांगोजी या गावात ही घटना १४ नोव्हेंबरच्या रात्री घडली. घटनेचे वृत्त कळताच परिसरात एकच खळबळ उडाली. आशाबाई दिलीप इंगळे असे या महिलेचे नाव असल्याचे समजते. आशाबाईंनी गायीच्या गोठ्यात लाकडं रचून त्यावर पांघरुन टाकले आणि त्यावर स्वत:ला पेटवून घेतल्याची माहिती आहे. या घटनेत आशाबाईंचा मृत्यू झाला.

दुष्काळ, नापिकी आणि वाढता कर्जबाजारीपणा आदी कारणांमुळे खचून गेलेल्या आशाबाईंनी स्वत:ला मृत्यूच्या दाढेत ढकलल्याची चर्चा परिसरात आहे. प्राप्त माहितीनुसार, ही घटना घडली त्या रात्री आशाबाईंनी मुले व घरातील इतर कोणत्याही व्यक्तीस काहीही कल्पना दिली नाही. त्यांनी थेट गायीच्या गोठ्यात चिता रचली आणि स्वत:ला पेटवून घेतले. दरम्यान, या प्रकाराची माहिती शेजाऱ्यांना समजताच त्यांनी एकच गलका केला. तसेच, आशाबाईंना वाचविण्यासाठी प्रयत्नही केले. पण, त्यात त्यांना यश आले नाही.

आशाबाई यांच्या पश्चात तीन मुले आहेत. त्यापैकी दोन मुले रोजंदारीने जातात. तर, एक मुलगी विवाहीत आहे. त्यांना साडेतीने एकर शेती होती. पती दिलीपराव इंगळे यांचा हृयविकाराच्या धक्क्याने २००८मध्येच मृत्यू झाला आहे. पतीच्या पश्चात त्या मोठ्या हिमतीने संसाराचा गाडा रेठत होत्या. मात्र, आर्थिक विवंचनेमुळे त्यांना हा गाडा रेठने दिवसेंदिवस कठीण होत होते. (हेही वाचा, महाराष्ट्रातील दुष्काळ: दुष्काळी तालुक्यांच्या यादीत तुमच्या तालुक्याचा समावेश आहे का? इथे पाहा)

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, आशाबाई इंगळे यांच्यावर जिल्हा सहकारी बँकेचे सुमारे ८० हजार रुपयांचे कर्ज होते. तसेच, त्यांना इतरही खासगी सावकारांचे देणे होते. यंदाच्या वर्षी त्यांनी सोयाबीनचे पिक घेतले होते. पण, सोयाबीन पिकाने दगा दिल्याने उत्पन्न कमी झाले होते. त्यातूनही त्यांनी कीही देणी चुकती केली. मात्र, येत्या काळात परिस्थिती अधिकच बिकट होईल या विचाराने त्या ग्रासल्या होत्या. त्यातूनच आलेल्या नैराश्येतून त्यांनी आत्महत्येसारखे पाऊल उचलले असावे असे बोलले जात आहे. दरम्यान, घटनेची माहिती कळताच अमरापूर पोलीसांनी घटनेची नोंद घेऊन तपास सुरु केला आहे.