Employment in Maharashtra: महाराष्ट्र सरकारचा कोरोना काळात बेरोजगारीवर मात करण्याचा प्रयत्न; तब्बल 1 लाख 32 हजार लोकांना मिळाला रोजगार
या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, रोजगार बंद पडले. अशावेळी लोकांना पुन्हा नव्याने उभारी देण्यासाठी राज्य सरकरने पुढाकार घेतला
कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) काळात लॉकडाऊनमुळे जवळजवळ प्रत्येकालाच आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला होता. या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, रोजगार बंद पडले. अशावेळी लोकांना पुन्हा नव्याने उभारी देण्यासाठी राज्य सरकरने पुढाकार घेतला. कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची (Unemployment) समस्या निर्माण झाली. पण कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले ऑनलाईन रोजगार मेळावे तसेच महास्वयंम वेबपोर्टलमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांच्या आधारे, लॉकडाऊनच्या काळात नोव्हेंबरअखेरपर्यंत राज्यात एकूण 1, 32,308 बेरोजगारांना रोजगार मिळाला. माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली.
नोव्हेंबर महिन्यात 16,380 बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. चालू वर्षात जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान एकूण 1,64,723 बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. कौशल्य विकास मंत्री श्री. मलिक म्हणाले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतींसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. अशा प्रकारे बेरोजगार आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम या वेबपोर्टलमार्फत करण्यात येते.
नोव्हेंबरमध्ये विभागाकडे 35,214 इतक्या नोकरी इच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. नोव्हेंबरमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे 16, 380 उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक 9,923 लोकांना रोजगार मिळाला.
(हेही वाचा: मध्य रेल्वे प्रवाशांचा प्रवास होणार वातानुकूलित, सीएसएमटी ते कल्याण दरम्यान उद्यापासून धावणार 10 एसी लोकल्स)
दरम्यान, राज्यात नुकत्याच 12 आणि 13 डिसेंबर रोजी झालेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळाव्यास उमेदवार व उद्योजकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने या मेळाव्याचा कार्यक्रम आता 20 डिसेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आला असल्याची घोषणा मंत्री श्री. मलिक यांनी केली. बेरोजगार तरुण व उद्योजकांनी याचा लाभ घ्यावा. नोकरीइच्छूक तरुणांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि आधार क्रमांकासह नोंदणी करावी.