Eknath Khadse Heart Attack: एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका; एअर अँब्युलन्स उपलब्ध करुन देण्यासाठी CM एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रशासनाला सूचना
दरम्यान, खडसे यांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खडसे यांना पुढील उपचारासाठी एअर अँब्युलन्स (Air Ambulance) उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याचे वृत्त आहे. त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने मुंबईला हालविण्यात येणार असल्याचे समजते. दरम्यान, खडसे यांना मुंबईला आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Khadse) यांनी एअर अँब्युलन्स उपलब्ध करुन देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. खडसे यांच्या कन्या रोहीणी खडसे यांनी मुख्यमंत्र्यांसाठी तातडीने संपर्क साधला होता. त्यानंतर अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली. खडसे सध्या जळगावात आहेत. त्यांना प्रकृती अस्वास्थ्याचा त्रास जाणवू लागल्याने डॉक्टरांना पाचारण करण्यात आले असता त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाले. मुख्यमंत्री हे सध्या सातारा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी दरे येथे आहेत.
एकनाथ खडसे हे राज्याच्या राजकारणातील ज्येष्ठ राजकीय नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. त्यांनी आयुष्यातील अनेक वर्षे भारतीय जनता पक्षात काम केले. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात रुजवण्यात आणि वाढविण्यात ज्या पहिल्या फळीतील काही लोकांचे योगदान होते. त्यापैकी एकनाथ खडसे एक मानले जातात. दरम्यान, विधानसभा निवडणूक 2014 मध्ये भारतीय जनात पाक्षाचे सरकार सत्तेत आले आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून खडसे यांच्या राजकीय कारकीर्दीस काहीशी उतरती कळा लागल्याचे बोलले जाऊ लागले.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात क्रमांक दोनचे नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि एकाच वेळी बारा खात्यांचा कारभार असलेल्या एकनाथ खडसे यांच्यावर भोसरी येथील भूखंड घोटाळ्याचा आरोप झाला. हा केवळ आरोप झाला नाही तर त्यांना त्या प्रकरणात राजीनामाही द्यावा लागला. खरे तर फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांवर तेव्हा भ्रष्टाचार आणि घोटाळ्याचे आरोप झाले. पण, त्यातील बहुतेकांना क्लिन चीट देण्यात आली. ही क्लिन चिट केवळ एकनाथ खडसे यांच्या वाट्याला अखेरपर्यंत आली नाही. पुढे भाजपध्ये त्यांचे इतके खच्चीकरण झाले की, त्यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम केला. पुढे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशकर्ते झाले. आजही ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहेत.
आक्रमक आणि अभ्यासू नेता अशी एकनाथ खडसे यांची ओळख आहे. सत्तेत असो की, विरोधात ते नेहमीच विरोधकांवर तुटून पडतात. खास करुन त्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेता म्हणून केलेले काम विशेष उल्लेखनीय राहिले. ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष देखील होते. शिवाय त्यांना मंत्रीपदाचाही मोठा अनुभव आहे.