रोहित पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'फिरते तारांगण' प्रकल्पाचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन; जाणून घ्या प्रकल्पाची खासियत

या प्रकल्पाचे उद्घाटन आज शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते मुंबईत पार पडले.

फिरते तारांगण व टेलिस्कोप प्रकल्पाचे उद्घाटन (Photo Credits: Twitter)

'विज्ञान विद्यार्थ्यांच्या दारी' या विचारातून आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अंतराळ व डिजिटल इंटरॅक्टिव क्लासरुम याची सांगड घालत 'फिरते तारांगण' प्रकल्पाची निर्मिती केली आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन आज (5 मार्च) शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्या हस्ते मुंबईत पार पडले. शालेय विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन या विषयात रुची निर्माण व्हावी आणि त्यांना डिजिटल शिक्षण मिळावे यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नातून या प्रकल्पाची निर्मिती करण्यात आल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

रोहित पवार यांनी त्यांच्या मतदारसंघासाठी फिरते तारांगण आणि टेलिस्कोप तयार करुन घेतले आहे. तसंच डिजिटल पद्धतीने शिक्षण देण्यासाठी ZP च्या 200 शाळांना 'डिजिटल इंटरॅक्टिव्ह पॅनल' देण्यात आले आहेत. यापूर्वी देखील 200 शाळांना हे पॅनल्स देण्यात आले आहेत. 'टेलिस्कोप'द्वारे ग्रह-तारे,आकाशगंगा बघता येईल व या क्षेत्रात करियर करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही फायदा होईल, असे रोहित पवार यांचे म्हणणे आहे.

रोहित पवार ट्विट:

यावेळी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, "या प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आकाशगंगा, ग्रह, तारे, अंतराळ याबद्दल माहिती मिळेल. परिणामी विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक वृत्ती आणि वैज्ञानिक जिज्ञासा निर्माण होईल. याचा विचार करुन रोहित पवार यांनी हा प्रकल्प सुरु केला आहे." दरम्यान, याबद्दल त्यांनी रोहित पवार यांचे कौतुकही केले.