Coronavirus: लॉक डाऊनच्या काळात पुणेकरांनी तोडले सर्वाधिक नियम; राज्यातील एकूण 27,432 गुन्ह्यांपैकी पुण्यात 3,255 गुन्ह्यांची नोंद

या काळात अत्यावश्यक सेवा सोडून इतर गोष्टी बंद आहेत. नागरिकांचे महत्वाची कामे वगळता घराबाहेर

Coronavirus lockdown | Representational Image (Photo Credits: IANS)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात 21 दिवसांचे लॉक डाऊन (Lockdown) चालू आहे. या काळात अत्यावश्यक सेवा सोडून इतर गोष्टी बंद आहेत. नागरिकांचे महत्वाची कामे वगळता घराबाहेर पडणेही बंद आहे. अशात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लागू केलेले लॉक डाउन व प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी, पोलिसांनी महाराष्ट्रभर 27,432 गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यांसंदर्भात आतापर्यंत तब्बल 1,886 लोकांना अटक करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक गुन्हे पुणे (Pune) जिल्ह्यात नोंदवले आहेत.

राज्य सरकारने कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये म्हणून निषेधात्मक आदेश जारी केले होते आणि आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर आयपीसी कलम 188 अन्वये गुन्हे दाखल केले जातील, असा इशाराही दिला होता. 22 मार्च ते 8 एप्रिल या कालावधीत एकूण 27,432 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. देशात लॉकडाऊन चालू असताना व राज्यात कलम 144 अंतर्ग एकत्र येण्यास बंदी असतानाही काही लोकांनी या आदेशांचे उल्लंघन केले आहे. आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येत आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत मुंबईत 1,679 गुन्हे, पुण्यात 3,255, पिंपरी चिचवडमध्ये 1,933, नागपुरात 1,999, सोलापुरात 2,594 आणि अहमदनगरमध्ये 2,449 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी 438 जणांवर विलगीकरणबाबत उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. यासह लॉकडाऊन दरम्यान पोलिसांवर हल्ल्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. त्याबाबत 60 गुन्हे नोंदवले गेले आहेत व याप्रकरणी 161 लोकांना अटक करण्यात आली आहे.

(हेही वाचा: Coronavirus: तबलिगी मरकज कार्यक्रमासाठी परवानगी दिलीच कशी? राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा केंद्र सरकारवर निशाणा)

वाहनांच्या बाबतीत बोलायचे झाले तर, राज्यात प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल पोलिसांनी एकूण 12,420 वाहने जप्त केली असून, त्यांच्या मालकांकडून 95.56 लाख रुपये दंड आकारण्यात आला आहे.