शेतकरी-आदिवासींच्या मोर्च्याची आझाद मैदानाकडे कूच; पोलिसांनी केले वाहतुकीमध्ये हे बदल
मोर्चा रात्रीच विधानभवनाकडे निघाला, या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनीदेखील आजच्या वाहतुकीमध्ये काही बदल केले आहेत
शेतकरी आणि आदिवासी लोकांनी आपल्या न्यायहक्कासाठी काढलेला मोर्चा आज विधानभवनावर धडकणार आहे. ‘उलगुलान मोर्चा’ असे नाव देण्यात आलेला हा मोर्चा, सोमय्या मैदानातून आझाद मैदानाच्या दिशेने रवाना झाला आहे. वनाधिकार कायदा आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, दुष्काळ निवारण, आदिवासी समस्या आणि कर्जमाफी अशा विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या या मोर्चात हजोरोंच्या संख्येने शेतकरी आणि आदिवासी जनता सामील झाली आहे. मुंबईकरांची आणि खासकरून शाळा-कॉलेजची मुले आणि चाकरमान्यांची कोणतीही गैरसोय होवू नये म्हणून हा मोर्चा रात्रीच विधानभवनाकडे निघाला. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनीदेखील आजच्या वाहतुकीमध्ये काही बदल केले आहेत.
साउथ मुंबई परिसरातून, जे जे फ्लायओव्हर, लालबाग फ्लायओव्हर आणि परेल फ्लायओव्हरचा वापर करून दादरकडे प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनी सकाळी 10 पर्यंत स्लीप रोडचा वापर करावा.
सीएसटीच्या दिशेने डॉ. बीए रोडवरील वाहतूक ही आहे तशीच सुरळीत राहणार आहे.
याचसोबत आझाद मैदान परिसरातील वाहतूक आणि ट्राफिक सकाळी 9-10 वाजता वाढणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी ट्वीटरमार्फत दिली आहे.
सकाळी 4.30 च्या सुमारास या मोर्च्याने आझाद मैदानाच्या दिशेने कूच केले. ठाणे, पालघर, भुसावळ जिल्ह्य़ातील आदिवासी आणि मराठवाडय़ातील शेतकरी आपल्या प्रलंबित मागण्या घेऊन या मोर्चात सहभागी झाले आहेत. या मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या लोकसंघर्ष मोर्चाने दिलेल्या माहितीनुसार सुमारे 18 जिल्ह्य़ांमधील 12 हजारांहून अधिक आदिवासी-शेतकरी या मोर्चासाठी मुंबईत आले आहेत.