Maharashtra Monsoon Session: कोरोनाचे रिपोर्ट्स वेळेत न मिळाल्याने विधानभवनाबाहेर कर्मचारी आणि अधिकारी खोळंबले, रिपोर्ट नसल्यास प्रवेशबंदी

जर कोरोनाचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले तरच त्या कर्मचा-याला आणि अधिका-यांना विधानभवनात प्रवेश दिला जाणार आहे. यामुळे आज सकाळीच विधानभवनाबाहेर गोंधळ उडाला.

विधान भवन मुंबई (फोटो सौजन्य-ट्वीटर)

कोरोनाच्या (Coronavirus) सावटाखाली आजपासून महाराष्ट्रात दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला (Maharashtra Monsoon Session) सुरुवात होत आहे. यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने विधानभवनात प्रवेश करणा-या कर्मचारी तसेच अधिका-यांची वैद्यकिय तपासणी करण्यात येत आहे. यामुळे आज सकाळी विधानभवनाबाहेर अधिकारी आणि कर्मचा-यांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाले. कोरोनाचे रिपोर्ट्स वेळेत न मिळाल्याने विधानभवनाबाहेर या लोकांना ताटकळत राहावे लागत आहे. जर कोरोनाचे रिपोर्ट्स निगेटिव्ह (COVID-19 Negative) आले तरच त्या कर्मचा-याला आणि अधिका-यांना विधानभवनात प्रवेश दिला जाणार आहे. यामुळे आज सकाळीच विधानभवनाबाहेर गोंधळ उडाला.

याआधी विधानसभा अध्यक्षांसह 35 आमदारांना कोरोनाची लागण झाली त्यात आणखी 3 आमदारांची भर पडली आहे. त्यामुळे ज्या आमदारांना किंवा अन्य विधानसभा सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे त्यांना या अधिवेशनाला उपस्थित राहता येणार नाही.  Maharashtra Monsoon Session: कोरोनाच्या सावटाखाली आजपासून 2 दिवसीय पावसाळी अधिवेशनाला सुरूवात

दरम्यान या दोन दिवसीय अधिवेशनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), सुभाष देसाई, अनिल परब विधानभवनात दाखल झाले आहेत. अजित पवार येताच येथील लोकांकडून त्यांना घडलेल्या प्रकाराबाबत माहिती मिळाली. ज्यांच्या कोरोना चाचण्या निगेटिव्ह आहेत त्यांनाच सभागृहात प्रवेश देण्यात येणार आहे असे सांगण्यात आले आहे. या प्रकाराबाबत अजित पवार स्वत: लक्ष घालत आहे. यामुळे विधिमंडळ परिसरात लोकांचा संभ्रम उडाला आहे. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराबाबत लोकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कोरोना व्हायरसमुळे यंदाच्या अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यात आला आहे. तर सचिवालयाला यंदा विधिमंडळात प्रवेश करण्यासाठी प्रत्येकाला त्यांचा कोरोना चाचणी आर टी पीसी आर टेस्टचा रिपोर्ट सादर करणं बंधनकारक करण्यात आलं होतं. आमदारांसह त्यांचे सचिव, पत्रकार आणि इतर सुरक्षा कर्मचार्‍यांनादेखील कोरोना टेस्ट बंधनकारक आहे. त्यासाठी मागील दोन दिवस विधिमंडळ परिसरामध्ये खास टेस्टिंगची सोय करण्यात आली होती.