Dombivli Traffic Update: ठाकुर्ली उड्डाणपुलाच्या डागडुजीच्या कामासाठी 21, 22 फेब्रुवारीला पूल रहदारीसाठी राहणार बंद; अशी असेल पर्यायी व्यवस्था
सोमवार 21 फेब्रुवारी दिवशी रात्री 12 वाजल्यापासून मंगळवार 22 फेब्रुवारीच्या रात्री 12 वाजेपर्यंत ठाकुर्ली उड्डाणपुल बंद असेल.
डोंबिवली (Dombivli) मध्ये वर्दळीच्या ठाकुर्ली उड्डाणपुलाच्या (Thakurli Bridge)
डागडुजीच्या कामासाठी येत्या 21, 22 फेब्रुवारी दिवशी हा पूल रहदारीसाठी बंद ठेवला जाणार आहे. सोमवार 21 फेब्रुवारी दिवशी रात्री 12 वाजल्यापासून मंगळवार 22 फेब्रुवारीच्या रात्री 12 वाजेपर्यंत हा पूल बंद असेल. यामुळे वाहतूक मार्गात काही बदल देखील ट्राफिक विभागाकडून करण्यात आले आहेत.
ठाकुर्ली पूल बंद असल्याने घरडा सर्कल, मंजुनाथ शाळा, टिळक पुतळा मार्गे सावरकर रस्ता, नेहरू मैदान रस्ता मार्गे ठाकुर्ली उड्डाणपुलाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना स. वा. जोशी हायस्कूल येथे प्रवेश नसेल. या रोडवरून येणार्या वाहनांना टिळक पुतळ्यावरून पाटणकर चौक (चार रस्ता) गिरनार चौक, म्हाळगी चौक, एस के पाटील शाळा मार्गे कोपर उड्डाणपुल मार्गे डोंबिवली पश्चिमेकडे जावे लागणार आहे.
ठाकुर्ली गाव, ठाकुर्ली रेल्वे स्टेशन वरून ठाकुर्ली उड्डाणपुलावरून ये-जा करणारी वाहतूक यांना नाना कानविंदे चौकात प्रवेश नसेल. या वाहन चालकांनी कानविंदे चौक येथून फडके रोड, इंदिरा चौक, ग्रीन चौक येथे उजव्या बाजूला वळून वि. शा. चिपळूणकर मार्ग, वा. दी. जोशी चौक, एस के पाटील शाळा वरून कोपर उड्डाण पुलाने डोंबिवली पश्चिमेकडे जायचे आहे.
डोंबिवली पश्चिमेकडून ठाकुर्ली पुलाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बावन चाळ मध्ये प्रवेश नसेल. या वाहन चालकांनी बावन चाळ येथून उजव्या बाजूला वळून महात्मा गांधी रोड, भावे सभागृह रस्त्याने पंडित दिन दयाळ चौकातून कोपर उड्डाणपूल मार्गे डोंबिवली पूर्व भागात यायचे आहे. दरम्यान वाहन चालकांनी या वाहतूक मार्गातील बदलाचे पालन करण्याचे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.