उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुलगा पार्थ पवार यांच्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरील ट्विटवर दिली प्रतिक्रिया, 'मला तेवढेच उद्योग नाही' असे म्हणत दिले 'हे' स्पष्टीकरण
अलीकडची मुलं काही ट्विट करतात. प्रत्येक वेळेस तुमच्या मुलाने हे ट्विट केलं विचारलं जातं, मला तेवढाच उद्योग नाही' असे अजित पवार यावेळी म्हणाले. तसेच 'जो तो स्वतंत्र विचाराचा असतो. प्रत्येकाला काय ट्विट करावं याचा अधिकार असतो.' असेही ते पुढे म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांचे चिरंजीव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार (Parth Pawar) यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा देत यासंदर्भातील एक ट्विट केले होते. पार्थ पवारांचे हे ट्विट चांगलेच चर्चेत आले आहे. याबाबत अजित पवार यांना विचारले असता 'मला तेवढेच उद्योग नाही. राज्यातील अनेक महत्त्वाच्या जबाबदा-या माझ्याकडे आहेत' अशी प्रतिक्रिया त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले. पार्थ पवारांनी मराठा आरक्षणासाठी बीडमधील एक तरुणाच्या आत्महत्येनंतर ट्विटच्या माध्यमातून आपला रोष व्यक्त केला होता.
'ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नाही हे आम्ही सांगितलेलं आहे. अलीकडची मुलं काही ट्विट करतात. प्रत्येक वेळेस तुमच्या मुलाने हे ट्विट केलं विचारलं जातं, मला तेवढाच उद्योग नाही' असे अजित पवार यावेळी म्हणाले. तसेच 'जो तो स्वतंत्र विचाराचा असतो. प्रत्येकाला काय ट्विट करावं याचा अधिकार असतो.' असेही ते पुढे म्हणाले. Maratha Reservation: मराठा आरक्षण प्रकरणी पार्थ पवार सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार; बीडमधील तरुणाच्या आत्महत्येनंतर घेतला निर्णय
पार्थ पवारांचे ट्विट:
विवेकच्या आत्महत्येने आमच्या मनात जी आग पेटवली आहे त्याने संपूर्ण व्यवस्था खाक होऊ शकते. संपूर्ण पिढीचं भविष्य धोक्यात आहे. सुप्रीम कोर्टात जाऊन हस्तक्षेप याचिका दाखल करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय माझ्यासमोर शिल्लक नाही. मराठा आंदोलनाची धगधगती मशाल ह्रदयात ठेवून विवेक तसंच इतर अनेक लाखो तरुणांसाठी न्यायाची मागणी करण्यास मी तयार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र” असे ट्विट पार्थ पवारांनी केले होते.
'विवेकची आत्महत्या ही दुर्दैवी घटना असून या दुर्दैवी घटनांचा मालिका सुरु होण्याआधी मराठा नेत्यांनी जाग व्हावं आणि लढावं. मराठा आरक्षणासाठी संघर्ष करावा लागेल. यासाठी महाराष्ट्र सरकारने ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे' असे पार्थ पवारांनी ट्विटमध्ये म्हटले होते.