Daund Mass Copying in HSC Exams 2023: दौंड मध्ये 12वी परीक्षेत शिक्षकांच्या मदतीने सामुहिक कॉपी; 9 शिक्षकांवर गुन्हा दाखल
सध्या या घटनेचा पुढील तपास यवत पोलीस करत आहेत.
महाराष्ट्रात कोविड 19 संकटानंतर यंदा पहिल्यांदाच कोणत्याही कोविड निर्बंधांशिवाय 10, 12वी परीक्षा घेण्याचा निर्णय झाला. 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. यंदा या परीक्षा कॉपीमुक्त पार पाडण्यासाठी अनेक प्रकारे काळजी घेण्यात आली होती. पण दौंड (Daud) मध्ये एक सामुहिक कॉपीचा (Mass Copying) प्रकार समोर आला आहे. दौंड मधील केडगावात शिक्षकांच्या मदतीने सामुहिक कॉपी झाली आहे. भरारी पथकाने धाड टाकल्याने हा प्रकार समोर आला. यामध्ये शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मीडीया रिपोर्ट्सनुसार, पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील केडगावच्या जवाहरलाल माध्यमिक विद्यालयामध्ये 12 वीची परीक्षा सुरू होती. त्यावेळेस परीक्षार्थ्यांना कॉपी करण्यासाठी मदत केल्याने 9 शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवत पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 27 फेब्रुवारीला 12वीच्या परीक्षा दरम्यान भरारी पथकाने शाळेला भेट दिली. त्यावेळी सामुहिक कॉपीचा प्रकार समोर आला. त्याला शाळेतील शिक्षक अप्रत्यक्षपणे जबाबदार असल्याचं समोर आलं. प्राथमिक शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी किसन दत्तोबा भुजबळ यांनी यवत पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
9 शिक्षकांविरोधात महाराष्ट्र गैरव्यहार प्रतिबंधक कायदा सन 1982 (महाराष्ट्र विद्यापीठ बोर्ड आणि इतर निर्दिष्ट परिक्षा कायदा 1982 चे कलम 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या घटनेचा पुढील तपास यवत पोलीस करत आहेत.
यापूर्वी नांदेडमधील एका परीक्षा केंद्रावरही परीक्षार्थ्यांना कॉपी पुरवली जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.