Mumbai Water Storage: मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणीसाठ्यात वाढ

गेल्या काही दिवसांपासून असलेला पावसाचा जोर आजही कायम आहे.

Tulsi Dam | (Photo credit: ANI))

गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुंबईत पावसाची (Mumbai Rain) संततधार सुरू आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणातील (Dam) पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत चालली आहे. या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) मुंबईचा पाणीप्रश्न सुटणार अशी चर्चा सुरु झाली आहे. जर पावसाने मुंबईत पावसाने अशीच मुसळधार हजेरी लावली तर मुंबईकरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटू शकतो. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या 48 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यापर्यंत मुंबईला हे पाणी पुरेल असं सांगण्यात येत आहे.  (हेही वाचा - Mumbai Rains: मुंबईत विक्रमी पाऊस, 24 तासांमध्ये 204 मिमी पावसाची नोंद)

मुंबईकरांना अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांपासून असलेला पावसाचा जोर आजही कायम आहे. हवामाना विभागाने आज रविवारी मुंबईला यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत अनेक ठिकाणी दिवसभर मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला असून प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

मुंबईकरांना पाणी पुरवठा करणारे अप्पर वैतरणा धरण, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या धरणांचा समावेश आहे. यामधील तुळशी हे धरण 100 टक्के भरले आहे. तर तानसा धरणामध्ये 86.66 टक्के पाणीसाठा झाला आहे. अप्पर वैतरणा धरणामध्ये 19.20 टक्के, मोडक सागर धरणामध्ये 75.17 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. मध्य वैतरणा धरणामध्ये 56.23 टक्के, भातसा धरणातही  56.23 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. विहार धरणामध्ये 75.82 टक्के पाणीसाठा झाला आहे.