COVID-19: मीरा-भाईंदरमध्ये आज मध्यरात्रीपासून 14 एप्रिलपर्यंत भाजीपाला विक्री पूर्णपणे बंद; महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांचे आदेश

संचारबंदीच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद ठेवण्यात आले आहे. परंतु कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे.

Vegetables (Photo Credits: Getty Images)

कोरोना विषाणूवर (COVID-19) नियंत्रण मिळवण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिलपर्यंत संचारबंदीची घोषणा केली होती. संचारबंदीच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद ठेवण्यात आले आहे. परंतु कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. या कठिण परिस्थितीत नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मात्र, मिरा-भाईंदर परिसरात (Mira-Bhayander) नागरिक रस्त्यावर, दुकानांवर, भाजीपाला खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी करु लागले आहेत. यातच कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेचा एक भाग म्हणून महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे (Chandrakant Dange) यांनी महत्वाची घोषणा केली आहे. आजपासून येत्या 14 एप्रिलपर्यंत शहरातील संपूर्ण भाजीपाला विक्री बंद ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

कोरोना विषाणूने संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने गेल्या तीन हजारो लोकांचा जीव घेतला आहे. तर, लाखो लोकांना आपल्या जाळ्यात अडकले आहे. आता भारतातही कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. यांच्यावर नियंत्रण मिळवण्याकरिता प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभुमीवर मिरा-भाईंदरचे आयुक्त डांगे यांनी उद्यापासून 4 दिवस संपूर्ण भाजीपाल्याची विक्री बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यवसायिक, दुकानदार मालक यांच्यावर उपरोक्त अधिसूचनेमधील महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियमानुसार, भारतीय दंडसंहिता कलम 188 अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. हे देखील वाचा- Coronavirus: महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 210 नवीन रुग्णांची नोंद; राज्यातील एकूण रुग्ण संख्या 1574 वर

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवरही कारवाई केली जात आहे.