Covid-19 Vaccination in Mumbai: 30 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण आजपासून सुरु; मुंबईत 'या' केंद्रावर मिळणार लस

मुंबईत 10 सरकारी लसीकरण केंद्रावर या वयोगटातील नागरिकांना लस मिळणार आहे.

COVID-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

राज्यात आजपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला (Vaccination) सुरुवात झाली आहे. मुंबईत (Mumbai) 10 सरकारी लसीकरण केंद्रावर या वयोगटातील नागरिकांना लस मिळणार आहे. सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत लसीकरण होणार आहे. मात्र यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन (Online Registration) करणे आवश्यक आहे. आजपासून या 10 लसीकरण केंद्रावर कोविशिल्ड (Covishield) लसीचे प्रत्येकी 200 डोसेस उपलब्ध असतील. दरम्यान,  30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण सत्रांचे नियोजन करण्याकरिता कोविन अॅपमध्ये आवश्यक बदल करण्यात येणार आहेत. (महाराष्ट्रात 19 जूनपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात)

मुंबईतील लसीकरण केंद्रांची यादी बीएमसीने (BMC) ट्विटद्वारे शेअर केली आहे. पाहुया कोणती आहेत ती केंद्र: प्रियदर्शनी पार्क- वाळकेश्वर, बीएमसी मुरली देवरा नेत्र रुग्णालय-कामठीपुरा, अकवर्थ लेपरसी-वडाळा, सेठ आयुर्वेदिक रुग्णलाय- सायन, केबी भाभा रुग्णालय- बांद्रा, एम डब्ल्यु देसाई रुग्णालय- मालाड, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय - बोरिवली ,देवनार मॅटर्निटी होम- देवनार, जॉली जिमखाना-विद्याविहार, वि.दा. सावरकर रुग्णालय- मुलुंड.

BMC Tweet:

आजपासून 30-44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरु होणार असल्याची माहिती काल रात्री आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. या लसीकरणाचा 45 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणावर कोणताही परिणाम होणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, देशासह राज्यात 16 जानेवारी पासून कोविड-19 लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवक, फ्रंटलाऊन वर्कर्स, दुसऱ्या टप्प्यात 60 वर्षांवरील नागरिक, तिसऱ्या टप्प्यात 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरु झाले. त्यानंतर 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण सुरु करण्यात आले. मात्र लसींच्या अपुऱ्या साठ्यामुळे काही लसीकरण केंद्रांवर या वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरण बंद होते. केवळ 45 वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण सुरु ठेवण्यात आले होते. त्यानंतर आजपासून 30-44 वयोगटासाठी लसीकरणची सुविधा खुली करण्यात आली आहे. त्याचबरोबर 21 जून पासून 18 वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण सुरु होणार आहे.