Coronavirus Update: महाराष्ट्रातील नागरिकांना मोठा दिलासा; राज्यात 5 हजारपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात सोमवारी एकूण 587 रुग्णांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
महाराष्ट्रासह (Maharashtra) संपूर्ण देशात कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. राज्यात सोमवारी एकूण 587 रुग्णांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यामुळे राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 5 हजारांच्या वर गेली आहे. कोरोना विषाणूने संपूर्ण भारताला हादरून सोडले आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित महाराष्ट्रात आढळून आले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने नागरिकांना तात्पूर्ता दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, सोमवारी ठाणे येथील 209 रुग्णांना घरी सोडण्यात आले. पुणे येथील 161, मुंबईतील 55, रायगड येथील 53 आणि औरंगाबाद येथील 43 अशा प्रकारे राज्यभरात एकूण 587 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यात मंगळवारी बरे होणाऱ्या 300 हून अधिक रुग्णांची अजून भर पडल्याने राज्यभरात 5000 रुग्ण बरे झाले आहेत. डॉक्टरांच्या उपचाराला आणि रुग्णांच्या इच्छाशक्तीला यशस्वी करण्यातील सर्वात महत्वाचा दुवा परिचारिका ठरत असून रुग्णाची शुश्रुषा करुन त्याला कोरोनामुक्त करण्यासाठी त्या परिश्रम घेत आहेत. कोरोनाच्या लढ्यात रुग्णांना बरे करण्यासाठी डॉक्टरांच्या खांद्याला खांदा देऊन अहोरात्र झटणाऱ्या, हिमतीने लढणा-या सर्व परिरचारीकांचे आरोग्यमंत्र्यांनी कौतुक केले आहे. हे देखील वाचा- BMC: मुंबई येथील धारावी परिसरात आज आणखी 66 नवे रुग्ण आढळले; आतापर्यंत 1 हजार 028 लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग तर, 40 जणांचा मृत्यू
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवरही कारवाई केली जात आहे.