Coronavirus Update: कोरोनाचा हॉटस्पॉट धारावी मध्ये आज 25 नवे रुग्ण; परिसरातील कोरोना बाधितांचा एकूण आकडा 1378 वर
यानुसार आता धारावी भागातील कोरोना बाधितांचा एकूण आकडा हा 1378 वर पोहचला आहे.
मुंबईतील (Mumbai) कोरोनाचा सर्वात भीषण हॉटस्पॉट (Coronavirus Hotspot) म्हणजेच धारावी (Dharavi) मध्ये आज कोरोनाचे नवे 25 रुग्ण आढळून आले आहेत. यानुसार आता धारावी भागातील कोरोना बाधितांचा एकूण आकडा हा 1378 वर पोहचला आहे. याबाबत मुंबई महापालिकेतर्फे (BMC) माहिती देण्यात आली आहे. मुंबई मध्ये कोरोनाचा शिरकाव होताच धारावी हे मुख्य केंद्र ठरले होते. चिंचोळ्या गल्ल्या आणि दाटीवाटीची वस्ती यामुळे हा भाग कोरोनाच्या प्रसारास पोषक ठरला परिणामी दिवसागणिक या भागातील कोरोनाचा धोका वाढू लागला होता. एकट्या धारावी साठी मुंबई माहापालिकेतर्फे अनेक खबरदारीचे मार्ग सुद्धा अवलंबण्यात आले होते. वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या विशेष टीमसहित या भागात नागरिकांच्या घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आली होती, वेळोवेळी परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले मात्र तरीही अजूनही या भागातील कोरोनाचा धोका काही केल्या कमी होत नाहीये.महाराष्ट्रातील कोरोना रुग्णाची आकडेवारी आणि तुमच्या जिल्ह्याविषयी सविस्तर जाणून घ्या एका क्लिक वर
दुसरीकडे मुंबई शहरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आजवर आढळले आहेत. महाराष्ट्रातील कोरोना बाधितांच्या आकड्यातील अर्ध्याहून अधिक रुग्ण हे मुंबई शहरात आहेत. आजवर मुंबईत कोरोनाचे 22 हजार 563 रुग्ण आढळले आहेत तर यापैंकी 800 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रात आता कोरोनाच्या रुग्णांचा आकडा हा सुद्धा 37 हजार 136 वर पोहचला आहे. राज्यात आजवर कोरोनामुळे 1325 मृत्यू झाले आहेत. ही आकडेवारी पाहता धारावी सहित मुंबईतील अनेक भाग ही रेड झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
ANI ट्विट
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून राज्यातील नागरिकांशी संवाद साधला होता, यावेळी त्यांनी कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी सर्व उपाययोजना केल्या जात आहेत मात्र हे वाढते आकडे पाहता आपल्याला कोरोनासोबत राहण्याची हिंमत ठेवावी लागणार आहे. असे आवाहनही केले होते.
दरम्यान, देशात आता कोरोनाबाधितांचा आकडा हा 1 लाखाच्या वर गेला आहे. कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 106750 इतकी झाली आहे. त्यातील 61149 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर 3303 जणांचा मृत्यू झाला आहे.