Coronavirus: पुण्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची मदत

राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) शहरात आढळून आले आहेत आहेत.

BMC Commissioner Iqbal Chahal (Photo Credits: BMC Twitter)

महाराष्ट्रात (Maharashtra) दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णाच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) शहरात आढळून आले आहेत आहेत. मुंबईतील कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची नुकतीच बैठक पार पडली आहे. पुण्यातील कोरोना रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांची मदत घेतली जाणार असल्याची चर्चा झाली आहे. मुंबईतील कोरोना रोखण्यासाठी इक्बाल सिंह चहल यांनी ज्या उपाययोजना केल्या, तोच पॅटर्न पुण्यात राबवण्यात येणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.

पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, सौरभ राव, एस. चोक्कलिंगम, विक्रम कुमार, श्रावण हर्डीकर या पुण्यातल्या अधिकाऱ्यांसह ही बैठक पार पडली आहे. दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मुंबईच्या धर्तीवर तातडीच्या रुग्णालयांची उभारणी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. तसेच पुण्यातील कोरोना रोखण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांची मदत घेतली जाणार आहे, अशीही या बैठकीत चर्चा झाली आहे. हे देखील वाचा- महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी; तुमच्या जिल्ह्यात किती कोरोना रुग्ण आहेत जाणून घ्या

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील वरळी, माहीम, दादर आणि दाट वस्ती असलेल्या धारावी परिसर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले होते. मात्र, धारावीमध्ये कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात मुंबई महानगरपालिकेने यश मिळवल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून त्यांचे कौतुक करण्यात आले आहे. मुंबईत रुग्णसंख्या दुपटीचा दर हा 50 दिवसांवर जाऊन पोहोचला आहे. तर डिस्चार्ज रेटही 70 टक्के आहे. मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात आहे. यामुळे मुंबई महापालिका क्षेत्रात पुन्हा पूर्ण लॉकडाऊनची गरज नाही, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर चार दिवसापूर्वी म्हणाल्या आहेत.

भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. राज्यात शुक्रवारी संध्याकाळी 8 हजार 308 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2 लाख 92 हजार 589 वर पोहचली आहे. यापैकी 11 हजार 452 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 20 हजार 480 जणांनी कोरोनावर मात केली आहे.