Coronavirus: महाराष्ट्रात आज कोरोना विषाणू च्या 229 नवीन रुग्णांची नोंद; राज्यातील संक्रमितांची एकूण संख्या 1364 वर
नुकतेच महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिलेल्या माहितीनुसार
देशावरील कोरोना विषाणूचे (Coronavirus) संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. नुकतेच महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज कोरोना विषाणूच्या 229 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यात एकूण रुग्ण संख्या 1364 झाली आहे. कोरोनाबाधित 125 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे तर सध्या राज्यात 1142 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत (Mumbai) आज कोरोना विषाणू संक्रमणाची 79 पॉझिटिव्ह प्रकरणे नोंदवली गेली असून, शहरातील एकूण कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या 775 झाली आहे.
कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव पाहता देशात लॉक डाऊन सुरु आहे. मात्र अजूनही अनेक ठिकाणी, विशेषतः मुंबईसारख्या गर्दीच्या शहरात काही ठिकाणी याचे काटेकोरपणे पालन होताना दिसत नाहीत. अशावेळी मुंबईच्या दाट लोकवस्तीच्या भागात लॉकडाऊन अधिक प्रभावी करण्यासाठी आणि निर्जंतुकीरणासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी महापालिकेला सूचना देण्यात आल्या आहेत. याभागात राज्य राखीव पोलिस दलाची मदत घेण्यातही गृहमंत्र्यांकडे मागणी केली आहे.
याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, मुंबईत वाढत्या कोरोना संक्रमणाबाबत अधिक जागरुक राहण्याची गरज आहे. मुंबईत कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता लॉक-डाउनचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी, एसआरपीएफ लावण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आहे. धारावीत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अग्निशमन दलाच्या माध्यमातून सार्वजनिक स्वच्छतागृहे स्वच्छ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (हेही वाचा: मुंबईत दाट वस्तीमधील नागरिकांमध्ये सोशल डिस्टंन्सिंगची समस्या येत असल्याने शाळांमध्ये हलवण्याचा विचार)
आज बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या धारावी येथे कोरोना विषाणूचे 3 नवीन रुग्ण आढळले आहेत. अशाप्रकारे येथील एकूण सकारात्मक रुग्णांची संख्या 17 वर पोहचली आहे. यामध्ये 3 जणांच्या मृत्यूचाही समावेश आहे. मुंबई मध्ये आज एकूण 9 रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान, आज राज्यात 25 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैंकी पुण्यातील 14, मुंबईतील 9, तर मालेगाव आणि रत्नागिरी येथे प्रत्येकी 1 मृत्यू झाला आहे.