Mucormycosis ची राज्यातील परिस्थिती चिंताजनक,अधिक औषधे पुरवा; राजेश टोपेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी

म्युकरमायकोसिस आजाराशी संबंधित असलेल्या औषधांचा जास्तीत जास्त पुरवठा राज्याला करण्यात यावा अशी मागणी नरेंद्र मोदींकडे आरोग्यमंत्र्यांनी केली आहे.

Rajesh Tope | (Photo Credits: ANI)

म्युकरमायकोसिस (Mucormycosis) म्हणजेच काळी बुरशी असा एक नवा आजार सध्या राज्यात डोकावू लागला आहे. राज्यात या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी वेळीच उपाययोजना करण्यात यावी यासाठी राज्याला या संदर्भातल्या औषधांचा पुरवठा वाढवण्याची मागणी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे केली आहे. म्युकरमायकोसिस आजाराशी संबंधित असलेल्या औषधांचा जास्तीत जास्त पुरवठा राज्याला करण्यात यावा अशी मागणी नरेंद्र मोदींकडे आरोग्यमंत्र्यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्याच्या 17 जिल्हाधिका-यांशी संवाद साधला. त्यावेळी राजेश टोपे यांनी आपले मुद्दे पंतप्रधानांसमोर मांडले. "राज्यातली रुग्णसंख्या कमी झाल्याने आता ऑक्सिजन आणि रेमडेसिविर या दोन्हींचीही कमतरता नाही. पण आता राज्यासमोर म्युकरमायकोसिस आजाराचा मुख्य प्रश्न उभा राहिला आहे" हा मुद्दा राजेश टोपे यांनी मांडला.हेदेखील वाचा- Mucormycosis ला महामारी घोषित करा; केंद्राचे राज्यांना निर्देश, सर्व प्रकरणांचा अहवाल देण्याच्याही सूचना

महाराष्ट्रात आता म्युकरमायकोसिस आजाराच्या उपचारासाठी लागणाऱ्या Amphotericin-B या प्रमुख औषधाची कमतरता आहे. राज्याला या औषधाच्या दीड ते दोन लाख कुप्यांची गरज आहे. राज्यात आत्तापर्यंत या आजाराचे 1500 रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी 850 रुग्ण रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत 90 रुग्णांचा या आजाराने मृत्यू झाला असल्याची माहितीही राजेश टोपे यांनी दिली.

मी केंद्राला म्युकरमायकोसिससंदर्भातल्या परिस्थितीची माहिती दिली आहे. तसंच या आजाराच्या उपचारासाठी अधिक औषधांची मागणीही केली आहे, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दरम्यान राज्यात काल दिवसभरात 34,031 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. 51,457 जण उपचारानंतर बरे झाले तर 594 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.