CM Uddhav Thackeray Live Today: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी 1.30 वाजता राज्यातील जनतेला संबोधणार; कोणत्या मुद्द्यांवर बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

तब्बल महिन्याभरानंतर मुख्यमंत्री जनेतला संबोधित करणार आहेत.

CM Uddhav Thackeray (Photo Credit: Twitter)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आज (8 नोव्हेंबर)  दुपारी 1.30 वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. तब्बल महिन्याभरानंतर मुख्यमंत्री जनेतला संबोधित करणार आहेत. यापूर्वी 11 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधत मुंबई मेट्रो कारशेड, कृषी कायदा आणि कोविड-19 ची परिस्थिती यावर भाष्य केले होते. त्यानंतर आजच्या भाषणात ते नेमकं काय आणि कोणत्या मुद्यांना हात घालणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे भाषण तुम्ही फेसबुक, ट्विटर, युट्युब, इंस्टाग्राम यावर लाईव्ह पाहु शकता.

गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसचे संकट नियंत्रणात येत असले तरी येणाऱ्या सणासुदीच्या काळात त्याचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून आज मुख्यमंत्री काही सूचना करणार का? अनलॉक 6  बद्दल काही बोलणार का? किंवा इतर कोणत्या मुद्दयांना हात घालणार हे काही वेळातच स्पष्ट होईल. तसंच रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्नब गोस्वामी यांच्या अटकेबद्दल भाष्य करणार का, याबद्दलही जनतेच्या मनात उत्सुकता आहे. दरम्यान, अर्नब गोस्वामी अटकेनंतर शिवसेना पक्ष, महाराष्ट्र सरकारवर  विरोधकांनी शाब्दिक हल्ला चढवला होता. आणीबाणीच्या परिस्थितीशी राज्यातील स्थितीची तुलना केली होती. त्यामुळे आज मुख्यमंत्री विरोधकांवर पलटवार करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

CMO Maharashtra Tweet:

राज्यात सध्या अनेक सेवा-सुविधा पूर्ववत झाल्या आहेत. मात्र अद्याप धार्मिक स्थळं सुरु करण्यात आलेली नाहीत. तसंच क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक कार्यक्रमांवरही बंदी आहे. त्याबाबत मुख्यमंत्री आज काही निर्णय जाहीर करणार का, असाही अंदाज लावला जात आहे. त्याचबरोबर सर्वसामान्यांसाठी बंद असलेली लोकल सेवा सुरु करुन मुख्यमंत्री दिवाळीची भेट देतील असा अंदाज असल्याने अनेकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. (Maharashtra Mission Begin Again अंतर्गत नोव्हेंबर महिन्यात काय सुरु राहणार आणि काय बंद? जाणून घ्या)

दरम्यान, दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा मास्क बाजूला सारत रोकठोक भाषण केले. त्यावेळेस त्यांनी विरोधी पक्षाकडून झालेल्या टीकांचा खरपूस समाचार घेतला होता.