CM Uddhav Thackeray Left Varsha Bungalow: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुटुंबासह सोडला 'वर्षा' बंगला; आता मुक्काम 'मातोश्री'वर (Watch Video)

यावेळी शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाच्या घोषणा दिल्या तसेच त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. यावेळी सगळेच कार्यकर्ते कमालीचे भावूक झाले होते.

CM Uddhav Thackeray (संग्रहित संपादित प्रतिमा)

शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काही आमदारांसह बंड करून गुवाहाटी येथे तळ ठोकला आहे. त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याची मागणी केली आहे. राज्यात चालू असलेल्या राजकीय उलथापालथी दरम्यान आज संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपणा ‘वर्षा’ निवासस्थान (Varsha Bungalow) सोडणार असल्याचे सांगितले होते. आता आपल्या संबोधनामध्ये नमूद केल्याप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे अधिकृत निवासस्थान, ‘वर्षा’ सोडले आहे.

आज रात्री साधारण 9.45 वाजता उद्धव ठाकरे सहकुटुंब ‘वर्षा’वरून आपले खाजगी निवासस्थान ‘मातोश्री’ वर राहण्यासाठी निघाले. सध्या महाराष्ट्रात चालू असलेल्या राजकीय गदारोळादरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी संध्याकाळी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेसमोर आपले मनोगत मांडले. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांनी आपल्याला सांगितल्यास आपण पदाचा राजीनामा देऊ असे सांगितले होते. शिवसेनेतील लोकांनाच मी नको असेल तर मुख्यमत्री पदावरुन दूर व्हायला तयार आहे, फक्त या आमदारांनी मला हे प्रत्यक्ष भेटून सांगावे असे ते म्हणाले होते.

यावेळी त्यांनी आपण मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ‘वर्षा’ बंगला सोडणार असल्याचेही नमूद केले होते. त्यानुसार ते आता वर्षामधून बाहेर पडले असून मातोश्रीवर गेले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, पुत्र आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे देखील उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे मुख्यमंत्र्यांना त्यांचे निवासस्थान सोडावे लागले आहे. (हेही वाचा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली मंत्रिमंडळ बैठक; जाणून घ्या महत्वाचे निर्णय)

दरम्यान, उद्धव ठाकरे वर्षा बंगला सोडतेवेळी हजारो शिवसैनिक बंगल्याबाहेर जमले होते. यावेळी शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाच्या घोषणा दिल्या तसेच त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. यावेळी सगळेच कार्यकर्ते कमालीचे भावूक झाले होते. शिवसैनिकांचं अभिवादन स्वीकारत गर्दीतून वाट काढत गाडीत बसून मुख्यमंत्री मातोश्रीच्या दिशेने रवाना झाले. परंतु वर्षा ते मातोश्री अशा मार्गावर, प्रत्येक चौकावर, कानाकोपऱ्यात शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना पाठींबा दर्शवण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती.