उद्धव ठाकरे यांचा मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना दिग्गजांना धक्का; जुन्यांना डच्चू, नव्यांना संधी
या वेळी हे चित्र बदलत उद्धव ठाकरे यांनी विधानसभा आणि विधान परिषद अशा दोन्ही सभागृह सदस्यांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे.
CM Uddhav Thackeray Cabinet Expansion: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) हे संसदीय राजकारणात नवखे असले तरी ते अगदीच नवखे नसून चांगलेच मुरब्बी असल्याचे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर काही दिवसांनंतरच स्पष्ट झाले होते. दरम्यान, ते केवळ मुरब्बीच नव्हे तर, राजकीय समयसूचकता आणि निर्णायक भूमिकेसाठी धक्कातंत्राचा वापर करणारे नेतेही असल्याचे पुढे आले आहे. ठाकरे यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. पण, यात मागच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात समावेश असलेल्या दिग्गज मंत्र्यांना या विस्तारातून वगळण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेतील अनेकांना जोर का 'झटका धिरे से दिया' अशी चर्चा या विस्तारानंतर राजकीय वर्तुळात रंगली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या धक्कातंत्राचा फटका बसलेले माजी मंत्री
- दीपक केसरकर
- रविंद्र वायकर
- तानाजी सावंत
- दिवाकर रावते
- रामदास कदम
जुन्यांच्या खांद्यावर नव्याने भार
दरम्यान, मागच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या काही मंत्र्यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ देत त्यांच्यावरील जबाबदारी कामय ठेवली आहे. ठाकरे मंत्रिमंडळात पुन्हा संधी मिळालेले चेहरे पुढील प्रमाणे
- एकनाथ शिंदे
- उदय सामंत
- सुभाष देसाई
- संजय राठोड
काही नव्या चेहऱ्यांना संधी
दरम्यन, उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील काही नव्या चेहऱ्यांनाही संधी दिली आहे. यात अॅड. अनिल परब यांचा प्रमुख समावेश आहे. (हेही वाचा, Maharashtra Cabinet Ministers List 2019: अशोक चव्हाण, धनंजय मुंडे ते आदित्य ठाकरे; 26 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्री सह महाविकास आघाडीचा आज पहिला मंत्रिमंडळ विस्तार; इथे पहा संपूर्ण यादी)
दरम्यान, मागच्या सरकारमध्ये शिवसेना पक्षाकडून मंत्री असलेल्या विजय शिवतरे, जयदत्त क्षीरसागर यांचा विधानसभा निवडणूक 2019 मध्ये पराभव झाला आहे. त्यामुळे त्यांना वगळण्यात आल्याची चर्चा आहे. तसेच, मागच्या वेळी मंत्रिमंडळामध्ये उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेतील आमदारांना अधिक झुकते माप दिल्याचे चित्र होते. या वेळी हे चित्र बदलत उद्धव ठाकरे यांनी विधानसभा आणि विधान परिषद अशा दोन्ही सभागृह सदस्यांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे.