CIDCO 2022 Lottery: सिडको कडून जानेवारी 2022 मध्ये 5 हजार घरांसाठी लॉटरी निघणार; मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
यामध्ये अत्यल्प उत्पन्न गट, अल्प उत्पन्न गटांमधील घरं उपलब्ध करून दिली जाणार आहेत. पुढील महिन्यात याच्या अर्जप्रक्रियेला सुरूवात होईल.
सिडको (CIDCO) कडून नव्या वर्षात काहींचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. 2022 च्या जानेवारीमध्ये सिडको कडून काही भागांत घरांसाठी लॉटरीसाठी अर्ज जारी केले जाणार आहेत. महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात 5000 घरांसाठी अर्ज काढले जातील. यामध्ये नवी मुंबई (Navi Mumbai) मधील कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी या भागांचा समावेश असणार आहे.
नवी मुंबईतील सिडकोची ही 5 हजार घरांसाठीची योजना 'महागृहनिर्माण' योजना असणार आहे. यामध्ये अत्यल्प उत्पन्न गट, अल्प उत्पन्न गटांमधील घरं उपलब्ध करून दिली जाणार आहेत. पुढील महिन्यात याच्या अर्जप्रक्रियेला सुरूवात होईल.
एकनाथ शिंदे ट्वीट
सिडकोकडून दिवाळी 2021 मध्ये काही नोडमधील सामाजिक उद्देशासह निवासी आणि वाणिज्यिक गळ्यांची विक्री करण्यात आली होती. यामध्ये नवी मुंबई येथील खारघर, पनवले, पुष्पक नगर नोडमधील भूखंड आणि नवी मुंबईच्या रेल्वे स्थानक संकुलासह सिडकोच्या गृहनिर्माण संकुलातील वाणिज्यिक गाळ्यांची विक्री करण्यात आली होती. दरम्यान कोरोना संकट काळामध्ये गृह प्रकल्पांची कामं रेंगाळली होती पण जशी हळूहळू अर्थव्यवस्थेला चालना मिळाली तशी कामाला पुन्हा सुरूवात झाली आहे. सिडको कडून प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत 2018-19 मध्ये घरांची लॉटरी काढण्यात आली होती त्यांचा फेझ 1 चा ताबा जुलै 2021 मध्ये देण्यात आला होता.