Mumbai Rain Alert: मुंबईत येत्या 24 तासांत अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज; तिन्ही मार्गावरील लोकल सेवा उशीरा
त्यामुळे येत्या 24 तासांमध्ये मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. आज पहाटेपासूनच मुंबईवर काळ्या ढगांनी गर्दी केली. पावसाच्या सरी बरसत आहेत.
Mumbai Rain Alert: मुंबई आणि आजुबाजूच्या परिसरात आठवड्याभरापासून जोरदार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. आज सोमवारीही पावसाचा जोर कायम आहे. हवामान खात्याने सोमवारी मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट(Orange Alert) जाहीर केला आहे. त्यामुळे येत्या 24 तासांमध्ये मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता (Mumbai Weather)आहे. आज पहाटेपासूनच मुंबईवर काळ्या ढगांनी गर्दी केली. मुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत. रविवारीही दिवसभर जोरदार पाऊस झाल्यानंतर रात्री पावसाने विश्रांती घेतली होती. त्यानंतर सोमवारी पहाटेपासून मुंबई शहर आणि उपनगर परिसरात पुन्हा एकदा मुसळधार पावसाच्या (Mumbai Rain) सरी बरसल्या. (हेही वाचा:Ratnagiri Flood Situation: कोकणात मुसळधार पाऊस, रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा पूरस्थिती )
पावसामुळे सकाळच्या वेळी कार्यालयात जाणाऱ्या कामगार वर्गाची धावपळ होताना दिसत आहे. उपनगरीय रेल्वे उशीराने धावत आहे. मध्य रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशीराने धावत आहे. पश्चिम रेल्वे 5 ते 10 मिनिटे आणि हार्बर रेल्वेच्या लोकल ट्रेन तब्बल 15 मिनिटं उशीराने धावत आहेत. रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्याने नोकरदार वर्गाची गैरसोय होण्याची शक्यता आहे. रस्ते वाहतूक नेहमीप्रमाणे संथगतीने आहे. (हेही वाचा:Kokan Weather forecast for Tomorrow: कोकणात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज! )
कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या परिसरामध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. अनेक रस्त्यांना तळ्याचे स्वरुप आले आहे. कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुडघाभर पाणी साचले आहे. गुरुदेव हॉटेल ते शिवाजी महाराज चौकापर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा रस्ताही जलमय झाला आहे.