BMC कडून तरुणांसाठी 'जेन झेड फेलोशिप प्रोग्राम' सुरू, 50 जागांसाठी दरमहा 61,500 विद्यावेतन मिळणार
बृहन्मुंबई महानगरपालिकेने तरुणांसाठी 'बीएमसी जेन झेड फेलोशिप प्रोग्राम' सुरू केला असून, यामध्ये २८ वर्षांखालील पदवीधरांसाठी ५० जागा उपलब्ध आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना बारा महिन्यांच्या कालावधीसाठी दरमहा ६१,५०० रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. अर्ज करण्याची मुदत १९ ते ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) तरुणांसाठी एक नवीन आणि आकर्षक संधी उपलब्ध करून दिली आहे. महापालिकेने 'बीएमसी जेन झेड फेलोशिप प्रोग्राम' ('Gen Z Fellowship Program') सुरू केला असून, यामध्ये पात्र उमेदवारांना नागरी प्रशासन समजून घेण्याची, धोरणकर्त्यांसोबत काम करण्याची आणि नेतृत्वगुण विकसित करण्याची संधी मिळणार आहे. 'विकसित मुंबई'साठी हातभार लावण्याच्या उद्देशाने ही फेलोशिप योजना आखण्यात आली आहे.
'Gen Z Fellowship Program' फेलोशिपची वैशिष्ट्ये
'Gen Z Fellowship Program' या कार्यक्रमांतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना शिकण्याची, नेतृत्व करण्याची आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये बीएमसीच्या प्रशासकीय कामकाजाची सखोल माहिती घेणे, धोरणकर्त्यांशी थेट संवाद साधणे, नेतृत्वकौशल्य विकसित करणे आणि मुंबईच्या भविष्यातील विकासात योगदान देणे यांचा समावेश आहे. फेलोशिप पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना सहभाग प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.
'Gen Z Fellowship Program' साठी पात्रता निकष
विकसित मुंबईच्या निर्मितीसाठी युवा पिढीला सुवर्णसंधी!
BMC GEN Z FELLOWSHIP PROGRAM#MyBMCUpdates #bmcfellowship #mumbai #youthempowerement #applynow pic.twitter.com/6p1xRH2i2L
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 20, 2026
'Gen Z Fellowship Program' या फेलोशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. तसेच मराठी भाषेतील लेखन, वाचन आणि बोलण्याचे प्रावीण्य असणे अनिवार्य आहे. याशिवाय हिंदी आणि इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान तसेच संगणक हाताळणी आणि इंटरनेट वापराचे ज्ञान असणेही गरजेचे आहे. अर्जदाराचे वय २८ वर्षांपेक्षा कमी असावे, अशी अट घालण्यात आली आहे.
विद्यावेतन आणि जागांची संख्या
निवड झालेल्या उमेदवारांना बारा महिन्यांच्या कालावधीसाठी दरमहा ६१,५०० रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. या फेलोशिप कार्यक्रमासाठी एकूण ५० जागा उपलब्ध असून, अर्ज करताना उमेदवारांना ५०० रुपये अर्जशुल्क भरावे लागणार आहे.
अर्ज कसा आणि कधी करावा
पात्र उमेदवारांनी https://bmc.recruitlive.in/#/login या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची मुदत १९ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत असून, इच्छुक उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
बीएमसीच्या या उपक्रमामुळे तरुणांना नागरी प्रशासन आणि धोरणनिर्मिती प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार असून, मुंबईच्या विकासात सक्रिय सहभाग नोंदवण्याचे व्यासपीठही उपलब्ध होणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 20, 2026 03:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

