Ganeshotsav 2020: BMC कडून समुद्रात गणपती विसर्जन करण्यास मनाई केल्याच्या सोशल मीडिया वृत्ताचे खंडन; असे कोणतेही आदेश दिले नसल्याचे स्पष्टीकरण
त्यामुळे यंदाचा गणेशोत्सवही (Ganeshotsav 2020) अगदी साधेपणाने साजरा होणार आहे. अशा सोशल मिडियावर एक बातमी व्हायरल होत आहे की, मुंबई (Mumbai) मध्ये बीएमसीने (BMC) समुद्रामध्ये गणपती विसर्जन (Ganpati Immersion) करण्यास मनाई केली आहे.
कोरोना विषाणूचा (Coronavirus) परिणाम सर्वच सण-उत्सवांवर झाला आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सवही (Ganeshotsav 2020) अगदी साधेपणाने साजरा होणार आहे. अशा सोशल मिडियावर एक बातमी व्हायरल होत आहे की, मुंबई (Mumbai) मध्ये बीएमसीने (BMC) समुद्रामध्ये गणपती विसर्जन (Ganpati Immersion) करण्यास मनाई केली आहे. अनेक लोकांनी हा संदेश शेअर केला आहे. त्यानंतर आता महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे की, मूर्ती विसर्जनासाठी 167 कृत्रिम तलाव बांधले असले तरी, समुद्रात कोणत्याही विसर्जनावर बंदी घातली नाही. याबाबत महापालिकेने एक परिपत्रक काढून माहिती दिली आहे.
या परिपत्रकात म्हटले आहे की, 'कोविड-19' च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने, गर्दी टाळून व आवश्यक ती खबरदारी घेऊन साजरा करण्याच्या सूचना आणि आवाहन यापूर्वीच पालिकेनेही केले आहे. मात्र श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी समुद्रात जाण्यास बंदी महापालिकेद्वारे घालण्यात आल्याचे वृत्त समाजमाध्यमांत प्रसारित होत आहे. या अनुषंगाने बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाद्वारे आवर्जून नमूद करण्यात येत आहे की, श्री गणेशमूर्तीचे समुद्रात विसर्जन करण्यावर बंदी महापालिकेद्वारे घालण्यात आलेले नाही. 'कोविड-19' च्या अनुषंगाने नागरिकांच्या सेवेसाठी बृहन्मुंबई महापालिकेतर्फे बृहन्मुंबई क्षेत्रात 167 कृत्रिम तलाव तयार करण्यात आलेले असून, सामाजिक दुरीकरण राखून कृत्रिम तलावात अधिक प्रमाणात श्री गणेशाचे विसर्जन करावे. मात्र असे असले तरीही समुद्रात विसर्जन करण्यावर महापालिकेने बंदी घातलेली नाही.’
एएनआय ट्वीट -
पुढे बीएमसीने म्हटले आहे. ‘समुद्रकिनाऱ्यालगतच्या एक ते दोन किलो मीटरच्या परिसरात राहणाऱ्या गणेश भक्तांनी आपल्या गणेशमूर्तीचे विसर्जन हे समुद्रात करण्यास हरकत नाही. तर इतरांनी म्हणजेच जे भाविक समुद्रालगत रहात नाहीत अशांनी प्राधान्याने घरच्या घरी किंवा कृत्रिम तलावातच गणेशमूर्तीचे विसर्जन करावे, अशी महापालिका प्रशासनाची सूचना आहे.’ (हेही वाचा: दिल्ली येथील ‘मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियमच्या दालनात गणेशमुर्तीचे प्रदर्शन व विक्रीला सुरुवात; महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचा उपक्रम)
शेवटी महापालिकेने सांगितले आहे की, ‘विसर्जनावेळी महापालिका प्रशासन व राज्य शासन यांनी वेळोवेळी केलेल्या सूचना/आवाहनाचे पालन करावे. त्याचबरोबर 'कोविड-19' च्या पार्श्वभूमीवर शारीरिक दुरीकरण, मास्क, सॅनिटायझर वापरुन हा उत्सव पार पाडावा.’