मुंबई: परवाना असलेल्या मद्य विक्रेत्यांना मद्य विक्रीसाठी BMC कडून परवानगी, मात्र 'ह्या' असतील महत्त्वाच्या अटी

मात्र त्यासाठी काही महत्त्वाच्या अटी घालण्यात आल्या आहेत. ज्या नियमांचे पालन करणे हे मद्य विक्रेत्यांसाठी बंधनकारक राहणार आहे.

Liquor | Image used for representational purpose | (Photo Credit: Wikimedia Commons)

मुंबईत (Mumbai) कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता राज्यात सुरु असलेल्या विकेंड लॉकडाऊनसह मुंबईत अनेक कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यात मद्य विक्रेत्यांना (Liquor Seller) देखील दुकाने बंद ठेवण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र एकूणच स्थिती पाहता मुंबई महानगरपालिकेने परवानाधारक वाईन शॉप (Wine Shops) विक्रेत्यांना मद्य विक्रीची परवानगी दिली आहे. मात्र त्यासाठी काही महत्त्वाच्या अटी घालण्यात आल्या आहेत. ज्या नियमांचे पालन करणे हे मद्य विक्रेत्यांसाठी बंधनकारक राहणार आहे.

परवानाधारक मद्य विक्रेत्यांना मद्य विक्रीची परवानगी देण्यात आली असली तरीही त्यांना केवळ होम डिलिवरी करता येईल असे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर या होम डिलिव्हरीसाठी सकाळी 7 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे.

तसेच मद्य विक्री करणा-या डिलिव्हरी बॉयने कोरोनाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिलिव्हरी बॉयने तोंडाला मास्क लावणे आणि त्याचे हात वारंवार सॅनिटाईज करणे बंधनकारक असणार आहे.

दरम्यान राज्यात शुक्रवारी संध्याकाळी 8 वाजल्यापासून विकेंड लॉकडाऊन सुरु झाला असून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. मुंबई मनपाने दिलेल्या ताज्या अपडेट्सनुसार, मुंबईत आज कोरोनाचे आणखी 9327 रुग्ण आढळले असून 50 जणांचा बळी गेला आहे. यामुळे मुंबईत कोरोना बाधितांची एकूण संख्या 5 लाख 10 हजार 225 वर पोहोचली आहे.