तळोजा एमआयडीसीत स्फोट; परिसरातील गावांना भूकंपसदृश्य धक्के
मात्र, स्फोटानंतर परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यांनी कंपनीबाहेर निदर्शने करत कंपनी बंद करण्याची मागणी केली.
तळोजा औद्योगिक वसाहत परिसरातील एका कंपनीत सोमवारी (२९ ऑक्टोंबर) सकाळी एक शक्तिशाली स्फोट झाला. या स्फोटामुळे कल्याण तालुका हादरुन गेला. स्फोट झाल्यानंतर परिसरातील सुमारे १४ गावांना भूकंपसदृश्य धक्के बसल्याचे समजते. दरम्यान, हा स्फोट नेमका कोणत्या कंपनीत झाला व त्याचे नेमके कारण काय याबाबत माहिती मिळू शकली नाही.
प्राथमिक स्वरुपात प्राप्त झालेली माहिती अशी की, तळोजातील नावाडा एमआयडीसीतील वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट कंपनीत हा स्फोट झाल्याचे बोलले जात आहे. या कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाल्याची चर्चा एमआयडीसीतील नागरिक, कामगारांमध्ये आहे. तसेच, या या स्फोटात एक कर्मचारी जखमी झाल्याचेही वृत्त आहे. दरम्यान, नाश्त्याची वेळ असल्याने कर्मचारी मोठ्या संख्येने कंपनीबाहेर गेले होते. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचीही चर्चा परिसरात सुरु आहे. (हेही वाचा, भयानक! तरुणाच्या गुप्तांगामध्ये प्रेशर पंपने भरली हवा)
दरम्यान, स्फोटाबाबत कंपनी प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. मात्र, स्फोटानंतर परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यांनी कंपनीबाहेर निदर्शने करत कंपनी बंद करण्याची मागणी केली. स्फोटाचे धक्के कल्याण तालुक्यातील आगासन गावापर्यंत पोहोचल्याचा दावा ग्रामस्थांनी केला असून, हे धक्के भूकंपसदृश्य प्रकारात बसल्याचाही आरोप ग्रामस्थांनी केला आहे.