IPL Auction 2025 Live

व्हिडीओ : खंडणीचा गुन्हा मागे घ्यावा म्हणून भाजप आमदारांनी धरले फिर्यादीचे पाय

आमदार योगेश टिळेकर हे खंडणीचा गुन्हा मागे घेण्यासाठी बुराटे यांच्या हाता-पाया पडताना दिसत आहेत्त

योगेश टिळेकर (Photo credit :YouTube)

काही दिवसांपूर्वी पुण्यातील ‘भाजप’चे आमदार योगेश टिळेकर हे खंडणी मागितल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडले असताना, आता याच खंडणी प्रकरणी आपल्यावरील गुन्हा मागे घ्यावा, यासाठी चक्क तक्रारदाराच्या हाता-पाया पडत असल्याचे समोर आले आहे. फिर्यादी रवींद्र बराटे यांनी एक स‍ीसीटीव्ही फुटेज प्रसारित केले आहे, ज्यामध्ये आमदार योगेश टिळेकर हे खंडणीचा गुन्हा मागे घेण्यासाठी बराटे यांच्या हाता-पाया पडताना दिसत आहेत्त.

आपल्याच मतदार संघात फायबर ऑप्टीकलची कामे चालू असताना धमकी आणि त्रास देत, फोनवरून पन्नास लाखाची खंडणी मागितली असल्याची फिर्याद रवींद्र बराटे यांनी दिली होती. याबाबत कोंढवा बुद्रुक पोलीस स्टेशनमध्ये योगेश यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र निवडणुकीच्या तोंडावर माझ्याबाबतीत केले गेलेले हे षडयंत्र असल्याचे सांगून योगेश यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. परंतू याप्रकरणी आता या नव्या सीसीटीव्ही फुटेजमुळे या गोष्टीला नवे वळण लागले आहे. कारण या फुटेजमध्ये चक्क आमदार बराटे यांच्यासमोर लोटांगण घालताना दिसत आहेत.

मात्र या प्रकारावर पडदा टाकण्यासाठी रवींद्र बराटे हे आपल्यापेक्षा वयाने मोठे असल्यानेच आपण त्यांच्या पाया पडलो, असे योगेश टिळेकर म्हणाले आहेत. आमदार योगेश टिळेकर यांच्यावर खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस अधिकारी मिलिंद गायकवाड यांची मुख्यमंत्र्याच्या गृह विभागाने बदली केली. यानंतर राज्यभरात या खंडणी प्रकरणाची मोठी चर्चा झाली होती.