भाजप आमदार चरण वाघमारे यांना महिला पोलिसाशी गैरवर्तणूक केल्याप्रकरणी अटक
चरण यांच्यासह भाजप शहराध्यक्ष अनिल जिभकाटे (Anil Jibhkate) व अन्य चार जणांवर एका ऑन ड्युटी महिला पोलिसांचा विनयभंग केल्याचा आरोप होता.
भारतीय जनता पक्षाचे (BJP) भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील तुमसर (Tumsar) येथील आमदार चरण वाघमारे (MLA Charan Waghmare) यांना आज (28 सप्टेंबर) पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. चरण यांच्यासह भाजप शहराध्यक्ष अनिल जिभकाटे (Anil Jibhkate) व अन्य चार जणांवर एका ऑन ड्युटी महिला पोलिसांचा विनयभंग केल्याचा आरोप होता. ही घटना 16 सप्टेंबर रोजी घडली असून 18 सप्टेंबर रोजी या मंडळींच्या विरुद्ध रीतसर तक्रार नोंदवण्यात आली होती. महिला पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या या तक्रारीवरुन त्यांच्यावर भा.दं. स. कलम 354 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, 16 सप्टेंबर रोजी तुमसर बाजार समिती येथे कामगारांसाठी सुरक्षा किट वाटप सुरु होते. याठिकाणी महिला, पुरुष कामगारांची गर्दी जमली होती, गर्दीला आटोक्यात ठेवण्यासाठी महिला पोलीस देखील कार्यरत होत्या. यावेळी भाजपा शहराध्यक्ष अनिल जिभकाटे यांनी काहीश्या वादातून संबंधित महिला पोलिसाला शिवीगाळ केला. वारंवार विंनती करूनही जिभकाटे यांनी आपल्या बोलण्यावर ताबा ठेवला नाही, इतक्यात आमदार चरण वाघमारे हे देखील या ठिकाणी दाखल झाले मात्र हा सर्व वाद सोडवण्याऐवजी त्यांनी सुद्धा महिला पोलीस कर्मचारीकेशी असभ्य भाषेत बोलण्यास सुरवात केली. याप्रकरणी अखेरीस दोन दिवसांनंतर या संबंधित कर्मचारिकेने तक्रार नोंदवली, मागील काही दिवसांपासून याप्रकरणी तपास सुरु होता.
ANI ट्विट
दरम्यान महिला अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 353, 354, 472, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंद केला आहे. यांनतर आमदार चरण वाघमारे यांनी पोलीसांना एक निवेदन देऊन चौकशीची मागणी केली होती. मात्र आज अखेरीस चरण यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.