IPL Auction 2025 Live

मंगळसुत्र गहाण ठेवून दिली पतीच्या खूनाची सुपारी; भिवंडी येथील धक्कादायक घटना

भिवंडीमधून ही धक्कादायक घटना समोर येत आहे.

Arrest (Photo Credits: File Image)

पतीच्या हत्येप्रकरणी 35 वर्षीय महिलेसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. भिवंडी (Bhiwandi) मधून ही धक्कादायक घटना समोर येत आहे. आपला प्रियकर आणि त्याच्या साथीदारांसोबत या महिलेने आपल्या पतीच्या खूनाचा कट रचला. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, आपल्या पतीच्या खुनाची सुपारी देण्यासाठी महिलेने चक्क मंगळसुत्र आणि काही दागिने गहाण ठेवून 1 लाख रुपये जमवले. खून करणाऱ्या माणसांना उरलेली 3 लाखांची रक्कम देण्यासाठी फ्किस्ड डिपॉझिटमधून पैसे काढण्याचा तिचा मानस होता.

श्रुती गांजी असे या महिलेचे नाव असून ती आपला पती प्रभाकर गांजी (43) सोबत राहत होती. हितेश वाला या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्यामुळे श्रुतीला आपल्या पतीपासून घटस्फोट हवा होता. तिचा पती देखील एका दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध होते. परंतु, आपल्या पत्नीला घटस्फोट देण्यास तो तयार नव्हता. श्रुतीने ही सर्व कहाणी तिची मैत्रिण प्रिया निकम (32) हिला सांगितली. या दोघींनी मिळून कॉन्ट्रॅट किलर संतोष रेड्डी (26) याला संपर्क केला. या खूनामध्ये 47 वर्षीय काशिनाथ धोत्रे आणि 28 वर्षीय रोहित बच्चुटे यांनी रेड्डीला मदत केली. पोलिसांनी हितेश वाला, प्रिया निकम आणि संतोष रेड्डीला अटक केली असून रेड्डीच्या इतर दोन साथीदारांचा शोध सुरु आहे.

31 जुलै रोजी रेड्डी आणि त्याच्या साथीदारांनी ऐरोलीवरुन भिवंडीला जाण्यासाठी गांजी यांची ओला गाडी बुक केली. मानकोळी नाक्यावर गाडी पोहचताच चायनीज खरेदी करण्यासाठी गांजी यांना गाडी थांबवण्यास सांगितले. गाडी थांबताच आरोपींनी गांजी यांचा गळा नायलॉय रश्शीने आवळला आणि घटनास्थळावरुन पळ काढला. घटनास्थळी आरोपींचे कोणतेही ठसे राहणार नाहीत, याची आरोपींनी काळजी घेतली होती, अशी माहिती भिवंडी गुन्हे शाखेचे सिनियर इन्स्पेक्टर अशोक होनमाने यांनी दिली.

खुनानंतर चौकशीकडून श्रुतीकडून दरवेळेस वेगवेगळी उत्तरे मिळत होती. मात्र कडक तपास केला असता श्रुतीने खूनाचा कट रचल्याची कबुली दिली.