भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेले वरवरा राव श्वसनाचा त्रास होत असल्याच्या तक्रारीनंतर रुग्णालयात दाखल
राव यांनी भूमिगत नक्षलवाद्यांसह मणिपूर, नेपाळमधून हत्यारं आणल्याचा कट रचल्याचे प्रथमदर्शी पुरावे असल्याचे सरकारी पक्षाने न्यायालयात सांगितले आहे.
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांनी पाच जणांवर आरोपपत्र दाखल केल्यानांतर आता देशभरातून पुन्हा अटकसत्र सुरु झाले आहे. शनिवारी १६ नोव्हेंबरला एल्गार परिषदेचा माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून कवी वरवरा राव (Varavara Rao) यांना हैदराबाद येथून अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर काही तासातच श्वसनाचा त्रास होत असल्याच्या तक्रारीवरून त्यांना ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
वरवरा राव (Varavara Rao) हे विद्रोही कवी आणि सीपीआय माओवादी संघटनेचे सभासद आहेत. राव यांनी भूमिगत नक्षलवाद्यांसह मणिपूर, नेपाळमधून हत्यारं आणल्याचा कट रचल्याचे प्रथमदर्शी पुरावे असल्याचे सरकारी पक्षाने न्यायालयात सांगितले आहे. सत्र न्यायालयाने वरवरा राव (Varavara Rao) यांना २६ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. वरावरा राव हे 29 ऑगस्टपासून नजरकैदेत होते.
31 डिसेंबर 2017 ला पुण्याच्या शनिवारवाड्यासमोर आयोजित एल्गार परिषदेच्या भाषणांमुळे दुसऱ्या दिवशी भीमा कोरेगावात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला, असा FIR पुण्याच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.