Rahul Gandhi On Savarkar: सावरकर यांच्याबद्दलच्या वक्तव्यावरुन राहुल गांधी यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल

बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shiv Sena) पक्षाच्या नेत्या वंदना डोंगरे (Vandana Dongre) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन ठाणे नगर पोलिस दप्तरी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Rahul Gandhi | (Photo Credit- ANI)

काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (VD Savarkar) यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी अदखलपात्र (Non-Cognizable) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shiv Sena) पक्षाच्या नेत्या वंदना डोंगरे (Vandana Dongre) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन ठाणे नगर पोलिस दप्तरी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधी यांनी 'भारत जोडो यात्रे' (Bharat Jodo Yatra) दरम्यान घेतलेल्या पत्रकार परिषदेत सावरकर यांनी ब्रिटीशांची माफी मागितली होती, असे विधान केले होते.

वंदना डोंगरे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, 'भारत जोडो यात्रे'दरम्यान, राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल काढलेल्या उद्गारांमुळे आपल्या भावना दुखावल्या आहेत. डोंगरे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांकडून भारतीय दंड संहिता कलम कलम 500, 501 अन्वये अदखलपात्र (नॉन-कॉग्निझेबल- NCR)) गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत महाराष्ट्रातील अकोला येथील पत्रकार परिषदेत घणाघाती टीका केली. सावरकर यांनी महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल यांसारख्या नेत्यांचा स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटीशांच्या माफीच्या पत्रावर स्वाक्षरी करून विश्वासघात केल्याचा आरोप राहुल यांनी केला होता. (हेही वाचा, Rahul Gandhi यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या इंग्रजांना दिलेल्या माफीनाम्याचं वाचन; Bharat Jodo Yatra रोखून दाखवण्याचं सरकारला आव्हान)

सावरकर यांच्या एका पत्राचा दाखला देत राहुल गांधी यांनी त्या पत्रातील काही मजकूरच पत्रकार परिषदेत वाचून दाखवला. वीर सावरकरांनी इंग्रजांना लिहिलेल्या पत्रात सावरकरांनी "साहेब, मी तुमचा सर्वात आज्ञाधारक सेवक राहण्याची विनंती करतो" असे म्हटले आणि त्यावर स्वाक्षरी केली. सावरकरांनी इंग्रजांना मदत केली. त्यांनी महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल यांच्यासारख्या नेत्यांचा विश्वासघात केला. ते पत्र त्यांनी केवळ भीतीपोटीच लिहिल्याचेही राहुल गांधी यांनी म्हटले.

राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत वंदना डोंगरे यांनी म्हटले आहे की, आमच्या महापुरुषांची बदनामी आम्ही सहन करणार नाही. वाचकांच्या माहितीसाठी असे की, वंदना डोंगरे या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रमुख आहेत.