BEST Strike: सलग सहाव्या दिवशीही बेस्ट कर्मचाऱ्यांची संपाची हाक
आज (13 जानेवारी) ही बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिल्याने सुट्टीच्या दिवशी ही प्रवाशांचे हाल होणार आहे.
BEST Strike: मागील पाच दिवसांपासून बेस्ट कर्मचाऱ्यांना पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आज (13 जानेवारी) ही बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिल्याने सुट्टीच्या दिवशी ही प्रवाशांचे हाल होणार आहे. मात्र न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर संप मागे घेतला जाईल अशी अपेक्षा होती परंतु तसे झालेले नाही. तर शनिवारी राज्य सरकारसोबत एक बैठक घेण्यात आली होती.
बेस्ट कामगार कृती समितीच्या शिष्टमंडळाची शनिवारी बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी बेस्ट प्रशासनाचे अधिकारी आणि कृती समितीचे शिष्टमंडळ उपस्थित होते. बेस्ट कर्माचाऱ्यांच्या मागण्यांबाबत यावेळी सविस्तर चर्चा होऊन यामधील ठळक मुद्दे सरकार समोर मांडण्यात आले. परंतु कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबात अद्याप कोणताही निर्णय देण्यात आलेला नाही. त्यामुळे रविवारी ही संप सुरु राहणार आहे.( हेही वाचा-BEST Strike: बेस्ट संप कायम, पाचव्या दिवशीही मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता)
सुधारित वेतन करार, बेस्ट उपक्रमाचे महापालिकेत विलीनीकरण अशा विविध मागण्या पूर्ण होण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली होती. तसेच गेली अडीच वर्षे बेस्ट कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागण्यांबाबत फक्त आश्वासने दिली गेल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता मागण्या पूर्ण करण्याबद्दल लेखी दिल्याशिवाय संप मिटणार नसल्याचे ठाम मत बेस्ट कर्मचाऱ्यांनी मांडले आहे.