आज मध्यरात्रीपासून BEST कर्मचारी संपावर

प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून संपाची हाक दिली आहे.

BEST bus (Photo Credits: PTI)

BEST Employees Strike: प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी (BEST Employees) सोमवारी मध्यरात्रीपासून संपाची हाक दिली आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने सुमारे 25 लाख प्रवाशांचे हाल होणार आहेत. तसंच त्यामुळे तिकीटातून मिळणारा जवळपास 3 कोटींचा नफा गमवावा लागणार आहे.

बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या संपाला प्रवाशांनी विरोध केला असून "आमची मुंबई, आमची बेस्ट" त्यामुळे आम्हाला सेवा मिळायला हवी, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. असे जरी असले तरी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या योग्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप पुकारताच दोन दिवसीय चर्चासत्राचे आमंत्रण दिले आहे. मात्र गेली अडीच वर्षे चर्चा सुरु असल्याने कर्मचारी संपाच्या निर्णयावर ठाम आहेत.

या मागण्यांसाठी बेस्ट कर्मचारी संपावर

महानगर पालिकांच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे 2016-2017, 2017-2018 या काळात सानुग्रह अनुदान मिळणे, एप्रिल 2016 पासून लागू होणाऱ्या वेतन कराराच्या तातडीने वाटाघाटी, अनुकंपा तत्त्वावर तातडीने भरती, कामगारांच्या निवास स्थानांचा प्रश्न सोडविणे आणि बेस्ट उपक्रमाचे महापालिकेत विलगीकरण करण्याचा महापालिका महासभेत मंजूर झालेल्या ठरावाची अंमलबजावणी या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या असून त्यासाठी त्यांनी संप पुकारला आहे.

संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मेस्माअंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी सांगितले आहे.