Beed APMC Result: बीड जिल्ह्यातील बाजार समितीवर धनंजय मुंडेचा झेंडा, पंकजा मुंडेंना धक्का

परळी मतदारसंघातील परळी व अंबाजोगाई या दोनही बाजार समित्यांवर धनंजय मुंडे यांनी एकेरी वर्चस्व प्रस्थापित करत भाजप नेतृत्वास मोठा धक्का दिला आहे.

Dhanajay Munde (Image Credit - Dhanajay Munde Twitter)

ग्रामीण राजकारणाचं केंद्र समजल्या जाणाऱ्या राज्यातील 147 बाजार समित्यांसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं. त्यापैकी 95 बाजार समित्यांची आज मतमोजणी होणार आहे. तर काही ठिकाणी आज मतदान होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अनेक बाजार समित्यांमध्ये भाजप आणि शिवसेना विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना पाहायला मिळतोय. बीड जिल्ह्यातील (Beed District) निवडणुका धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) या बहिण भावामुळे प्रतिष्ठेची बनली होती. दरम्यान 6 पैकी 5 बाजार समित्यांवर महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली असून, भाजपसह शिंदे गटाला मोठं धक्का बसला आहे

.

परळी मतदारसंघातील परळी व अंबाजोगाई या दोनही बाजार समित्यांवर धनंजय मुंडे यांनी एकेरी वर्चस्व प्रस्थापित करत भाजप नेतृत्वास मोठा धक्का दिला आहे. अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालात धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवत असलेल्या योगेश्वरी शेतकरी विकास पॅनलच्या 18 पैकी 15 जागा निवडणूक आल्या आहेत. तर परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अद्याप मतमोजणी सुरू असून, 18 पैकी 11 जागा धनंजय मुंडे यांच्या वैद्यनाथ शेतकरी विकास पॅनलने जिंकल्या आहेत, तर उर्वरित सातही जागी धनंजय मुंडे यांच्या पॅनलचे उमेदवार आघाडीवर आहेत.

गेवराईमध्ये माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलने 18 पैकी सर्व 18 जागा जिंकल्या आहेत. बीड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांना मात देत 18 पैकी 15 जागा निवडून आणल्या आहेत. या विजयानंतर  महाविकास आघाडीकडून जोरदार जल्लोष करण्यात येत आहे.