मुंबईमध्ये घर घेत असल्यास व्हा सावध! म्हाडा एजंट, एमएमआरडीए अभियंता यांच्यावर ज्येष्ठ नागरिकाची 18 लाखांची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल

त्यानंतर सदनिकेचा ताबा मिळावा यासाठी लाड यांनी वारंवार सोनवणे व वाघचौरे यांच्याशी संपर्क साधला, मात्र दोघांनी वेगवेगळी सबब सांगितली.

Building | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) एजंट आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) अभियंता यांच्यावर रमेश लाड नावाच्या 62 वर्षीय व्यक्तीची 18 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलुंड पूर्व येथील रमेश वाघचौरे (50) आणि गोरेगाव पूर्व येथील गणेश सोनवणे (50) अशी आरोपींची नावे असून त्यांनी लाड यांना परवडणाऱ्या घराचे खोटे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक केली.

एफआयआरनुसार, व्यवसायातून निवृत्त झालेले आणि रोलिंग हिल्स को-ऑप-सोसायटी, एलआयसी कॉलनी, बोरिवली पश्चिम येथे राहणारे रमेश लाड (62) यांची एका नातेवाईकाने म्हाडा एजंट गणेश सोनवणे याच्याशी ओळख करून दिली होती. 2017 मध्ये सोनवणे याने लाड यांच्या नातेवाईकासह लाड यांच्या घरी भेट दिली आणि जोगेश्वरी पूर्व येथे कमी किमतीत फ्लॅट देऊ केला. हा करार एकूण 28 लाख रुपयांमध्ये झाला, ज्याचे हप्त्यांमध्ये पेमेंट करायचे होते.

पुढे 8 दिवसांनंतर सोनवणे याने लाड यांना 15 दिवसांत फ्लॅटचा ताबा देण्याचे आश्वासन देऊन, एमएमआरडीए अधिकाऱ्याला 6.50 लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. लाड यांनी सोसायटीचे कर्ज घेऊन सोनवणेला 6.50 लाख रुपये दिले. नंतर सोनवणेने लाड यांना 10 लाख त्याच्या बँक खात्यात आणि 10 लाख एमएमआरडीएचा अभियंता रमेश वाघचौरे याला हस्तांतरित करण्यास सांगितले. लाड यांनी त्या सूचनांचे पालन केले.

नंतर, एक महिन्याने लाड यांनी फ्लॅटच्या ताब्याबाबत चौकशी केली असता, बांधकाम सुरू असून, आणखी सहा महिने लागतील, असा दावा सोनवणे याने केला. त्यानंतर सदनिकेचा ताबा मिळावा यासाठी लाड यांनी वारंवार सोनवणे व वाघचौरे यांच्याशी संपर्क साधला, मात्र दोघांनी वेगवेगळी सबब सांगितली. पुढे 2021 मध्ये सोनवणे याने लाड यांना स्वत:चे घर हस्तांतरित करण्याचे आश्वासन दिले आणि करार केला, परंतु तो प्रत्यक्षात आला नाही. त्यांनतर 2022 आणि 2023 मध्ये वाघचौरे याने 8.50 लाख रुपये लाड यांना परत केले परंतु उर्वरित 18 लाख आरोपींकडे राहिले. (हेही वाचा: मनसे अध्यक्ष Raj Thackeray यांनी घेतली CM Eknath Shinde यांची भेट; जाणून घ्या कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा)

अखेर लाड यांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आणि तक्रार दाखल केली. 10 ऑक्टोबर रोजी पोलीस ठाण्यात आयपीसी कायद्याच्या कलम 34, 406, आणि 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.