कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील 106 गावांमध्ये प्रवेशबंदी
महसूल विभागाने यासंबंधीचे आदेश काढले आहेत.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना ग्रामीण भागात देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यात अमरावती (Amravati) जिल्ह्यात रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील 106 गावांमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे बाहेरून येणा-या लोकांना या गावात प्रवेश करता येणार नाही. लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, अमरावती जिल्ह्यातील रुग्णसंख्या आटोक्यात यावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. महसूल विभागाने यासंबंधीचे आदेश काढले आहेत.
अमरावती जिल्ह्यात दररोज सरासरी 900 कोरोनाबाधित आढळून येत आहेत. प्रशासनाच्या विविध उपाययोजना नंतरही रुग्णांच्या संख्येत घट होत नसल्याचे चित्र असल्याने आता ज्या गावांमध्ये अधिक करोना रुग्ण आहेत. अशा गावांमध्ये मात्र बाहेरच्या नागरिकांना प्रवेशबंदी करण्याबाबतचे आदेश महसूल विभागाने काढले आहेत.हेदेखील वाचा- Coronavirus in Maharashtra Update: महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 56,647 रुग्ण आढळले असून 669 जणांचा बळी
या आदेशानुसार, ज्या गावांमध्ये 10 च्या कोरोना रुग्ण असलेल्या गावांमध्ये बाहेरील नागरिकांना सीमेवरच थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहे. या गावांमध्ये आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात आलेली आहे. तर कोणालाही गावांमध्ये जाण्यास निर्बंध घालण्यात आले आहे. त्याचबरोबर येथील प्रशासनाने काही महत्त्वाचे नियम देखील घातले आहेत. गृहविलगीकरणातला रुग्ण घराच्या बाहेर आढळल्यास त्याला 25 हजाराचा दंड होणार आहे. या गावांतील ये-जा करण्यासाठी असलेले सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. अतिमहत्त्वाच्या कामासाठी ये-जा करणाऱ्या लोकांची नोंद घेतली जात आहे.
नियमाचे पालन न करणाऱ्या नागरिक अथवा व्यावसायिकावर दंडाची कठोर कारवाई केली जाणार आहे. गावातील रुग्णांची वाढती संख्या बघता गावातील कोणीही बाहेर जाऊ नये व बाहेरील व्यक्ती गावात प्रवेश करू नये, याची नोंद घेण्यात येत आहे. अति महत्त्वाच्या कामाकरिता परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच गावांतील सर्व दुकाने पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याची खबरदारी घेण्यात येत आहे.