Badlapur Electricity Issue: सातत्याने वीजकपातीमुले बदलापूर येथील नागरिक हैराण; वैद्यकीय सेवा, उद्योग आणि शैक्षणिक संस्थाच्या कामावर परिणाम
बदलापूरात गेल्या काही दिवसात येथील महावितरणाच्या यंत्रणेने वीज पुरवठा करण्यासाठी सक्षम नसल्याचे समोर आले आहे.
बदलापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना वारंवार जाणाऱ्या विजेमुळे मोठा त्रास हा सहन करावा लागत आहे. एकीकडे विजेअभावी पिण्याचे पाणी मिळणेही दुरापास्त झाले असताना वीज नसल्याने ग्रामीण उपजिल्हा रूग्णालयातही वाताहत झाल्याचे चित्र देखील निर्माण झाले आहे. बदलापुरातील औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांवरही वीजसंकट असून उद्योग चालवायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शाळा, बॅँकाचे व्यवहार आणि दुकानदार हैराण आहेत. (हेही वाचा - Stipend for Maharashtra Students: 'लाडकी बहीण' नंतर आता विद्यार्थ्यांसाठी खास योजना; दरमहा 8 आणि 10 हजार रुपये स्टायफंड, घ्या जाणून)
बदलापूरात गेल्या काही दिवसात येथील महावितरणाच्या यंत्रणेने वीज पुरवठा करण्यासाठी सक्षम नसल्याचे समोर आले आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या यंत्रणेलाही सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने शहरात पाणीबाणी आहे. खुद्द प्राधिकरणाने याबाबत नागरिकांना सूचीत करत पाणी व्यवस्थापन करण्याचे आवाहन केले आहे. दोनच दिवसांपूर्वी एका रोहित्राच्या दुरूस्तीमुळे येथील उपजिल्हा रूग्णालयाला पाच तास विजेविना काढावे लागले. रूग्णालयाची पर्यायी व्यवस्था सक्षम नसल्याने रूग्णांना त्याचा फटका बसला.
उद्योजकांच्या बदलापूर इंडस्ट्रीयल वेल्फेअर असोसिएशन अर्थात बिवा संघटनेने गेल्या सहा महिन्यात 275 वेळा वीज पुरवटा खंडीत झाल्याची नोंद केल्याची माहिती संघटेनेचे अध्यक्ष कुशल जैन यांनी दिली आहे. या औद्योगिक क्षेत्रात 290 कंपन्या असून त्यात कापड उद्योग, रसायन आणि अभियांत्रिकी कंपन्यांचा समावेश आहे. रासायनिक कंपनीत प्रक्रियेवेळीच वीज खंडीत झाल्यास काही अपघात घडण्याचीही भीती जैन यांनी व्यक्त केली आहे.