Avinash Jadhav Resigns: मनसे नेते अविनाश जाधव यांचा ठाणे, पालघर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा
ठाणे, पालघर येथील विधानसभा निवडणूकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.
मनसेचे नेते आणि ठाणे, पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav ) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अविनाश जाधव यांना मनसे (MNS) कडून विधानसभेची उमेदवारी देण्यात आली होती मात्र मनसेला या निवडणूकीत एकही जागा जिंकता न आल्याने पराभव जिव्हारी लागलेल्या अविनाश जाधव यांनी आपला राजीनामा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना पाठवला आहे. मनसे पक्ष प्रमुखांना पाठवलेल्या पत्रामध्ये त्यांनी ठाणे, पालघर येथील विधानसभा निवडणूकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
मनसेला 2024 च्या विधानसभा निवडणुकीमधून अनेक मोठ्या अपेक्षा होत्या. भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होईल आणि तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठिंब्याने सत्तेत बसेल असा विश्वास राज ठाकरेंनी निवडणूकीच्या प्रचारात बोलून दाखवला होता मात्र प्रत्यक्षात राज ठाकरेंची एकही जागा निवडून न आल्याने सध्या राज ठाकरे त्यांच्या कार्यकर्त्यांशी, उमेदवारांशी बोलून या पराभवामागील कारणं शोधत आहेत. काही दिवसांपूर्वी अविनाश जाधव यांनी अन्य मनसे उमेदवारांसोबत राज ठाकरेंची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी ईव्हीएम वर संशय व्यक्त केला आहे. Tejaswini Pandit on Assembly Election Results: आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू- अभिनेत्री तेजस्वीनी पंडीत .
विधानसभा निवडणूकीत भाजपा सह महायुतीला अभुतपूर्व यश मिळालं आहे. विरोधकांनी या यशामागे ईव्हीएम हॅक झाल्याचा संशय बोलून दाखवला आहे. अनेक ठिकाणी मतदार आणि झालेलं मतदान याचं गणितचं जुळत नसल्याने मोठा घोटाळा झाल्याचा दावा केला आहे. अद्याप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच ईव्हीएम विरोधातही ते काय भूमिका घेणार? हे उघड केलेले नाही.
अविनाश जाधव हा मनसेचा ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या तरूण चेहर्यांपैकी एक आहे. अविनाश जाधव यांनी ठाण्यात अनेक आंदोलनात मनसे ची बाजू मांडली आहे. टोलनाक्यापासून सामान्यांच्या अनेक प्रश्नांवर मनसेने केलेल्या आंदोलनात अविनाश जाधव यांना जनाधार मिळाला असल्याने त्यांच्या निवडून येण्याबाबत अनेकांना अपेक्षा होत्या. मात्र विधानसभेत आता अविनाश जाधव यांना तिसर्या स्थानी समाधान मानावं लागलं आहे. ठाण्यात भाजपाचे संजय केळकर निवडून आले आहेत.