Aurangabad: मद्यधूंद 'ती' बेधुंद झाली, कुख्यात गुंडासोबत कारवर नाचली; औरंगाबाद येथे कायद्याची पायमल्ली जनतेने भररस्त्यात पाहिली
त्याने कारागृहात राहुन काहीच बोध घेतलेला दिसत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा औरंगाबाद येथील पोलीस आणि जनता यांची डोकेदुखी वाढली आहे.
औरंगाबाद (Aurangabad) येथील व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे (Viral Video) एका कुख्यात गुंडाचा कारनामा पुढे आला आहे. शेख जावेद उर्फ टिप्या शेख मकसूद (Sheikh Javed akaTipya Sheikh Maqsood) (रा. विशालनगर) असे या गुंडाचे नाव आहे. गारखेडा येथील गुंड मकसूद याने भररस्त्यात कार उभी करुन आपल्या मैत्रिणीसोबत दारु ढोसत कारच्या छतावर जाऊन डान्स (Woman Dances With Gangster) केला. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. धक्कादायक म्हणजे संबंधित तरुणीही या गुंडासोबत नाचताना दिसते. तसेच सीगारेटचे झुरके आणि बॉटलमधील मद्याचे घुटके घेताना दिसते. शेख जावेद उर्फ टिप्या शेख मकसूद याच्यावर गंभीर स्वरुपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
घडल्या घटनेमुळे पोलिसही चक्रावुन गेले आहेत. घडल्या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी तपास करत या गुंडाला ताब्यात घेतले. तरुणी मात्र अद्याप फरार असून, पोलिस तिचा शोध घेत आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार संबंधित तरुणी ही एका डीवायएसपी (पोलीस उपनिरीक्षक) ची मुलगी आहे. अद्याप ती पोलिसांना सापडू शकली नाही.
प्राप्त माहितीनुसार कुख्यात गुंड शेख जावेद उर्फ टिप्या शेख मकसूद याच्यावर विनयभंग, चोरी, मारहाण, लुटमार यांसारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. एका हत्या प्रकरणातही त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. प्रमोद दामोदर खाडे या व्यक्तीला मारहाण करत या गुंडाने 13 जुलै 2019 रोजी लुटले होते. या घटनेनंतर पुंडलिकनगर पोलिसांनी या गुंडाला अटक केले होते. तेव्हा त्याच्याकडून पिस्तुल आणि जिवंत काडतुसेही हस्तगत करण्यात आली होती. (हेही वाचा, बिहार: भाजप समर्थकांना बदडले, खासदारांनाही धक्काबुक्की? संतप्त पूरग्रस्तांचा कथीत व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल)
औरंगाबादचे तत्कालीन आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी शेख जावेद उर्फ टिप्या शेख मकसूद याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई केली होती. त्यामुळे 9 ऑक्टोबर 2019 पासून तो हर्सुल कारागृहात होता. मात्र, 30 सप्टेंबरपासून तो पुन्हा कारागृहाबाहेर आला. तो कारागृहातून बाहेर येणार म्हणून अनेक गुन्हेगारांनी कारागृहाबाहेर गर्दी केली होती. या गुन्हेगारांनी त्याच्यासोबत फोटो काढले, हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केले.
दरम्यान, हर्सुल कारागृहातून बाहेर येताच शेख जावेद उर्फ टिप्या शेख मकसूद हा पुन्हा एकदा आपल्या मूळ वर्तनावर गेला आहे. त्याने कारागृहात राहुन काहीच बोध घेतलेला दिसत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा औरंगाबाद येथील पोलीस आणि जनता यांची डोकेदुखी वाढली आहे.