कोल्हापूर: पन्हाळगडावर सापडला शिवकालीन तोफगोळ्यांचा साठा
या माहितीने या परिसरात खळबळ उडाली आहे.
कोल्हापूरमधील (Kolhapur) पन्हाळगडावर (Panhalgad) एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. कोल्हापूरातील या पावनखिंडीवर तोफगोळ्यांचा मोठा साठा सापडला आहे. लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, या गडावर दिशादर्शक फलक लावण्याचे काम सुरु असताना तोफ गोळे सापडल्याची माहिती येथील स्थानिक नागरिकांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, हे तोफगोळे शिवकालीन असल्याचे सांगण्यात येत आहे. या माहितीने या परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या रिपोर्टनुसार, पन्हाळगडाच्या शेजारी चार किलोमीटर पावनगड आहे. हा गड छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला होता. तो पन्हाळ गडाचा संरक्षक गड मानला जातो. रेडेघाट परिसरात असलेला हा गड वनविभागाच्या ताब्यात आहे. येथे वनविभाग आणि 'टीम पावनगड' या संघटनेच्या वतीने विकासकामे सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या गडाच्या महत्त्वाच्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्याचे काम सुरु होते. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला.हेदेखील वाचा- मध्य रेल्वेच्या EMU सेवेला पूर्ण झाली 96 वर्ष; जाणून घ्या VT-Kurla दरम्यान सुरू झालेल्या या सेवेबद्दल खास गोष्टी
फलक लावण्यासाठी खड्डा खोदला जात असताना महादेव मंदिराशेजारी तोफगोळ्यांचा साठा सापडला. त्याचे मोजमाप केले असता चारशेवर तोफगोळे असल्याचे आढळून आले. 100 ते 250 ग्रॅम वजनाचे हे तोफगोळे आहेत. ते एकावर एक असे रचून ठेवले होते. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार या ठिकाणी दारूगोळ्याचे कोठार होते. या परिसरात आणखी तोफगोळे सापडण्याची शक्यता आहे.
शिवकालीन गडावर एवढ्या मोठ्या प्रमाणात तोफगोळा सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे शिवरायांच्या काळातील एवढी मोठी गोष्ट हाती लागणे हे पाहून शिवप्रेमींमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण आहे.