Antila Bomb Scare Case: सचिन वाझे यांच्या घरातून सापडली 62 काडतुसे; तपासात मदत करत नसल्याचा वकिलांचा आरोप

यावेळी वाझे यांच्या घरातून 62 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

Sachin Vaze (Photo Credits: Facebook)

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या मुंबईतील घराजवळ सापडलेल्या स्फोटक प्रकरणाबाबत सध्या सुरू असलेल्या तपासादरम्यान,  राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (NIA) माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्या घरी भेट दिली. यावेळी वाझे यांच्या घरातून 62 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. सरकारी वकिलांनी या प्रकरणाची माहिती दिली आहे. वाझे यांच्यावर मुंबई स्फोटकांच्या प्रकरणात सामील झाल्याचा आणि या प्रकरणामध्ये जप्त करण्यात आलेल्या स्कॉर्पिओ कारचा मालक मनसुख हिरेनच्या मृत्यूमध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे. महत्वाचे म्हणजे या 62 काडतूसांच्याबाबत वाझे कोणतीही माहिती देण्यास तयार नाहीत.

सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 सरकारी काडतुसांपैकी केवळ 5 ची माहिती मिळू शकली आहे. वाझे उर्वरीत 25 बद्दल माहिती देत ​​नाहीत. याशिवाय वकिलांनी अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे डीव्हीआर हटवल्याचा आरोपही वाझेवर केला आहे. वाझे तपासात मदत करत नसल्याचेही वकिलांनी म्हटले आहे. संशयित कारमध्ये जिलेटिन असल्याचे एफएसएलच्या अहवालातून सिद्ध झाले आहे, असेही ते म्हणाले. या प्रकरणात सहभागी आरोपींचे डीएनए नमुने घेण्यात आले आहेत. काल एनआयएने वाझे आणि इतरांवर बेकायदेशीर कृती प्रतिबंधक कायदा म्हणजेच यूएपीए लागू केला आहे.

मात्र आता कोर्टाने एनआयएला प्रश्न विचारला आहे की, नक्की कशाच्या आधारे यूएपीए लागू केला गेला आहे? गाडीत बॉम्ब मिळाला नसतानाही युएपीए का लागू कला? असे कोर्टाने विचारले आहे. सुनावणीदरम्यान कोर्टाने म्हटले की, गाडीत जिलेटिन सापडले आहे व तो स्फोटक आहे बॉम्ब नव्हे. डिटोनेटरशिवाय जिलेटिन फुटू शकत नाही, त्यामुळे बॉम्ब नसताना यूएपीए कसे लावले? (हेही वाचा: माजी मुंबई पोलिस आयुक्त Param Bir Singh यांनी Bombay High Court मध्ये दाखल केली याचिका)

दरम्यान, सचिन वाझे यांना मुंबईतील स्कॉर्पिओमध्ये सापडलेल्या स्फोटक प्रकरणात अटक करण्यात आली आहे. 25 फेब्रुवारीला ही गाडी मुकेश अंबानी यांच्या बंगल्याजवळ सापडली होती. काही दिवसांनंतर ही गाडी ज्याच्याजवळ होती तो मनसुख हिरेन मृत अवस्थेत आढळला. हिरेनच्या मृत्यूच्या प्रकरणात वाझे यांचेही नाव समोर आले. त्यानंतर आता त्यांना 25 मार्चपर्यंत एनआयएच्या ताब्यात दिले आहे. वाझे याच्यावर स्फोटकांनी भरलेले वाहन घटनास्थळी नेल्याचा आरोप आहे.