'राज्यात असलेले सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी शिवसेनेसोबत, सच्चा शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जाणार नाही'; राज्यातील शिवसेनेच्या नेत्यांची भूमिका

आपल्या ट्वीटमध्ये सुभाष देसाई म्हणतात, ‘शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र, शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात कोणताही सच्चा शिवसैनिक कदापि अविश्वास दाखविणे शक्य नाही.’

Subhash Desai and Omprakash Rajenimbalkar (संग्रहित संपादित प्रतिमा)

राज्यातील सत्ता संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पाठींबा देणाऱ्या बंडखोर आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. शिवसेनेने (Shiv Sena) गुवाहाटी येथे थांबलेल्या बंडखोर आमदारांना मुंबईला येऊन चर्चा करण्याचे आवाहन केले आहे, परंतु अजूनही त्यावर शिंदे गटाकडून कोणतेही उत्तर आले नाही. अशात राज्यातील शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचे सांगितले आहे. नेते सुभाष देसाई (Subhash Desai) आणि ओमप्रकाश राजेनिंबाळकर (Omprakash Rajenimbalkar) यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे.

आपल्या ट्वीटमध्ये सुभाष देसाई म्हणतात, ‘शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र, शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात कोणताही सच्चा शिवसैनिक कदापि अविश्वास दाखविणे शक्य नाही.’

दुसरीकडे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी, ज्याप्रकारे आमदार कैलास पाटील बंडखोर आमदारांच्या गटातून उद्धव ठाकरे यांच्याकडे परत आले त्याबाबत त्यांचे कौतुक केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, ‘जात, गोत्र अन धर्म आमचा  शिवसेना शिवसेना शिवसेना. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राचे राजकारण एका वेगळ्या वळणावर आले आहे. यात शिवसेनेच्या काही नेत्यांनी वेगळा निर्णय घेऊन आपल्याच काही सहकाऱ्यांना महाराष्ट्राबाहेर घेऊन जाऊन पक्ष श्रेष्टींशी प्रतारणा केली आहे.’

‘यातील अनेक जण हे परत येऊ इच्छितात व या सगळ्या सहकाऱ्यांमध्ये पहिले हिमतीचे काम केले ते माझे मित्र व सहकारी आमदार श्री.कैलास पाटील यांनी. त्यांनी स्वतः सगळा प्रसंग आज प्रेस समोर सांगितला. सत्ता येत राहते व जात राहते परंतु जे धैर्य व निष्ठा तुम्ही शिवसेना व आपल्या पक्ष प्रमुखांबद्दल दाखवली त्याची नोंद ही कायमस्वरूपी राजकीय इतिहासात झाली. कैलासजी व माझा अनेक वर्षांचा स्नेह अतिशय संयमी व मितभाषी असलेले कैलासजी हे पक्षाबद्दल व ’ठाकरे’ परिवाराबद्दल कायमच भावूक असलेले मी वेळोवेळी पाहिले आहे व त्याची प्रचिती पूर्ण राज्याला या दोन दिवसात आलीच आहे.’

‘आम्ही बाळासाहेबांना दैवत मानणारे त्यांच्याच पुत्राला या संकटसमयी एकटे सोडून कसे जाणार. आपण धाराशिवचा आमदार तर आहोतच पण सर्वप्रथम बाळासाहेबांचा मावळा आहे, हेच आमदार कैलास पाटील यांनी दाखविले. माझ्या मित्राच्या या निष्टेबद्दल व धैर्याबद्दल आमदार कैलास पाटील यांना मनापासून सलाम.’

‘असे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी पूर्ण राज्यात आहेत ज्यांचा धर्म, जात व गोत्र फक्त ‘शिवसेना’ आणि असे सर्व जण खंबीरपणे उद्धवजी ना साथ देणार आहोत, हे ही निश्चित. पदाधिकारी पूर्ण राज्यात आहेत ज्यांचा धर्म, जात व गोत्र फक्त ‘शिवसेना’ आणि असे सर्व जण खंबीरपणे उद्धवजी ना साथ देणार आहोत, हे ही निश्चित.’